मुंबई : धारावी मेघवाडीतील गणेशनगर येथील 42 हून अधिक झोपड्या बळजबरीने पाडण्याचा इशारा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) लेखी नोटीसव्दारे रहिवाशांना दिल्याने त्यास प्रत्युत्तर म्हणून धारावीतील एकही झोपडी तोडू देणार नाही, हा इशारा देण्यासाठी धारावी बचाव आंदोलन या संघटनेतर्फे रविवारी सभा होत आहे. धारावीतील कामराज हायस्कूलसमोर येत्या रविवारी 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वा. ही इशारा जनसभा होईल.
आदित्य ठाकरे सभेला धारावी बचाव आंदोलनाच्या या इशारा सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई,माजी आमदार बाबुराव माने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 8 डिसेंबर सोमवारपासून उपराजधानी नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असतानाच त्याच्या आदल्या दिवशी होणाऱ्या इशारा सभेत आदित्य ठाकरे काय बोलतात याकडे धारावीकरांचे लक्ष आहे. या इशारा सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शपच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव, याच पक्षाचे धारावी तालुका अध्यक्ष उलेश गजाकोष,सपाचे आबू आझमी,रहिम मोटारवाला, शेकापचे राजेंद्र कोरडे,वंचित बहुजन आघाडीचे अनिल शिवराम कासारे,एकता असोसिएशनच्या इशरत खान, शेकाप विद्यार्थी संघटनेच्या साम्या कोरडे,आम आदमीचे राफेल पॉल,बसपाचे संजीवन जैस्वार आदींसह असंख्य धारावीकर या सभेत सहभागी होणार आहेत.या सभेला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्तेही हजर राहणार आहेत.
गणेशनगरमधील 42 झोपड्या तोडण्याबाबत आणि या तोडल्या जाणाऱ्या झोपड्यांच्या बदल्यात झोपडपट्टीवासीयांना अनामत रक्कम व भाडे देण्याबाबत नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी या झोपडपट्टीवासीयांची चर्चा झालेली असतानाही या झोपड्या खाली करुन मिळालेल्या नाहीत म्हणून या झोपड्यांवर कारवाई करावी असे सूचित केले आहे, असे एसआरएने या झोपडपट्टीवासीयांना पाठवलेल्या इशारा पत्रात नमूद केले आहे.या झोपड्या हे पत्र मिळाल्यानंतर 7 दिवसांच्या आत खाली न केल्यास विकासकासोबत ठरलेले भाडे न घेतल्यास झोपडपट्टी अधिनियमानुसार या झोपड्यांवर बळाचा वापर करुन कारवाई करण्यात येईल,असे स्पष्ट या इशारा पत्रात आहे.या पार्श्वभूमीवर धारावीत ही इशारा जनसभा होत आहे.
काय आहेत मागण्या?
धारावीत प्रत्येक पात्र-अपात्र झोपडपट्टीधारकास 500 चौ.फु.चे घर द्या.
कोणालाही धारावीबाहेर हाकलणार नाही हे लेखी आश्वासन सरकारने द्यावे.
घर व दुकान यांच्या बदल्यात घर- दुकाने-व्यवसाय सुलभ जागा द्या.
जेथे झोपडपट्टी तेथेच झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन हे सरकारचे वर्षानुवर्षाचे धोरण असतानाही अपात्र ठरवल्या जाणाऱ्या धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी कोणत्या कारणास्तव धारावीबाहेर जागा देण्यात आल्या,याचा खुलासा सरकारने करावा.