Maharashtra Politics
मुंबई : मंत्रिपद मिळण्यापूर्वी 'जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना' अशा शब्दांत थेट पक्ष सोडण्याचा इशारा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंच्या जागी कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर मोठे विधान केले आहे. धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली, तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे वक्तव्य करत भुजबळ यांनी राजकीय वर्तुळात खळबड उडवून दिली आहे.काँग्रेस फुटली त्यावेळी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर होती, पण मी शरद पवारांसोबत गेलो, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भुजबळ यांनी हे विधान केले आहे. मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले तर काय करणार, असा सवाल भुजबळ यांना विचारण्यात आला होता. त्यावर मुंडे यांना क्लीन चिट मिळाली, तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन. मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याबाबत माझी काहीही हरकत नाही. मी या मंत्रिमंडळात पुन्हा आलोय, मला सन्मानाने परत बोलावले. मुंडे आरोपांतून मुक्त झाले, त्यांची लाइन क्लीअर झाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे भुजबळ म्हणाले.
यासंदर्भात अजित पवारांशी चर्चा झाली आहे का, असे विचारले असता यासंदर्भात चर्चा होवो अगर ना होवो राजीनाम्याचा निर्णय मीच घेणार, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
खरी राष्ट्रवादी कोणाची याबाबत विचारले असता, शरद पवार या वयातदेखील आणि शारीरिक व्याधी असतानाही ते माझ्यापेक्षाही जास्त काम करतात. अजित पवार सकाळी ६ वाजता कामाला सुरुवात करतात, मी त्यांचे सांगणार नाही. पण शरद पवार आजही काम करतात. जेव्हा शिवसेना-भाजपचे सरकार होते, तेव्हा शरद पवार भाजप नेत्यांना म्हणाले होते की, तुम्ही शिवसेनेला सोडा आणि आमच्याबरोबर युती ठेवा, अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी त्याचाच एक भाग होता. मात्र ऐनवेळी शरद पवार हे काँग्रेस आणि उध्दव ठाकरेंकडे वळले. खरे तर, एकनाथ शिंदे भाजपबरोबर जाण्याआधी शरद पवारांची भाजपबरोबर जाण्याची चर्चा होती, असा गौप्यस्फोटही भुजबळ यांनी केला.