

नाशिक : कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्यात पुन्हा एकदा जुंपल्याचे चित्र आहे. नरेंद्र दराडे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर मंत्री भुजबळ यांनी ‘हे बंधू इकडून तिकडे उड्या मारायचे काम करतात,’ असा गंभीर आरोप केला. त्यास नरेंद्र दराडे यांनीही भुजबळांना चोख प्रत्युत्तर दिले. ‘पाच पक्ष बदललेल्या मंत्र्यांनी माझ्यावर बोलू नये,’ असा पलटवार दराडे यांनी केला आहे.
विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. दराडे यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री भुजबळ यांनी दराडे बंधूंवर नाव न घेता निशाणा साधला आहे. मंत्री भुजबळ म्हणाले, ‘एक बंधू सत्तेत असतो, दुसरा सत्तेच्या बाहेर असतो, आणि मुलगा शिवसेना पक्षाचा पदाधिकारी म्हणून कार्य करतो. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांशीच ते संपर्कात असतात. मग ज्याच्या हातात सत्ता असते, त्याच्याकडे जाऊन थांबतात,’ असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, मंत्री भुजबळांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना नरेंद्र दराडे म्हणाले, ‘मंत्री छगन भुजबळ यांनी पाच पक्ष बदलले आहेत. अशा नेत्यांनी माझ्यावर टीका करू नये.’ दराडे आणि भुजबळ यांच्यात रंगलेल्या या शाब्दिक युद्धामुळे येवला तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.