नवी मुंबई: यंदाच्या आंबा हंगामाची सुरुवात लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर झाली आहे. देवगड येथील आंबा उत्पादक शेतकरी अरविंद वाळके यांनी उत्पादित केलेल्या हापूस आंब्याच्या दोन पेट्या मुंबईतील एम.एन.डी. पानसरे अँड सन्स कंपनी येथे विक्रीसाठी पाठवल्या आहेत. त्यांचा दर ३८ ते ४० हजार असल्याचे समजते.
बऱ्याच वर्षांनंतर नोव्हेंबर महिन्यात देवगडचा हापूस आंबा विक्रीसाठी बाजारात दाखल झाला आहे. यंदा कोकणातील हवामानातील बदलांचा आंबा पिकावर मोठा परिणाम झाला आहे. सुरुवातीच्या काळात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे काही आंब्यांच्या झाडांना मोहोर आला होता.
अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन हा मोहोर आणि त्यातून तयार झालेली फळे टिकवली. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना आंब्याचे उत्पादन टिकवण्यात यश आले असून हा आंबा आता बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.
यंदा पालवी गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास एक महिना लवकर आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे यंदाचा मुख्य आंबा हंगाम एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदा आंब्याचे उत्पादन कमी राहण्याचा अंदाज
गेल्या वर्षीही आंब्याचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होते. यंदाही सुरुवातीची परिस्थिती पाहता आंब्याचे उत्पादन मर्यादित राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच काळात दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक सुरू होती; मात्र यंदा दक्षिण भारतातूनही सुरुवातीचा माल कमी प्रमाणात बाजारात येत आहे. त्यामुळे यंदा देशांतर्गत आंब्याची एकूण आवक कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.