Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: मुंबई महानगर पालिकेच्या यंदाच्या निवडणुकीचा प्रचार आता रंगात येऊ लागला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे मुलाखती देत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मुलाखती देऊन आरोप प्रत्यारोपांना उत्तरे देत आहेत.
दरम्यान, पुढारी न्यूजला दिलेल्या खास मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका २०१७ च्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या काळात शिवसेना अन् भाजप यांच्यात काय काय झालं याचा गौप्यस्फोट केला. त्यांनी भाजपचा महापौर सहज होत असतानाही सर्वकाही सोडून देऊन बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला याचं कारण प्रसन्न जोशी यांना सांगितलं.
मुलाखतीच्या सुरूवातीला देवेंद्र फडणवीस यांनी प्रसन्न जोशी यांच्या राज ठाकरेंसोबत असलेल्या मैत्रीबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी दिलखुलास उत्तर देत आता ते जरी टीका करत असले तरी त्यांच्यासोबत चहा घेण्याचा प्रसंग आला तर नक्की घेईन असं सांगितलं.
फडणवीस म्हणाले, 'राज ठाकरे आता आमच्यावर टीका करत आहेत. त्यांच्या टोकाच्या टीकेला टोकाचे उत्तर देईन. मात्र निवडणूक झाल्यानंतर जर त्यांनी चहाला बोलवलं तर मी आनंदानं जाईल.' यावर प्रसन्न जोशी यांनी फक्त शिवतीर्थावर चहापानाबद्दल बोलताय. मातोश्रीचं काय असं छेडलं असता फडणवीस यांनी मातोश्रीचे दारे माझ्यासाठी २०१९ मध्येच बंद झाल्याचं सांगितलं.
फडणवीस म्हणाले, 'जर मातोश्रीचे दरवाजे बंद नसते तर मी तिथेही गेलोच असतो. मैत्री ही एकतर्फी होत नसते. तुम्ही जरवाजे बंद केल्यावर मी येऊन तुमचा दरवाजा ठोठावेन ही परिस्थिती माझ्यावर आज नाही.'
फडणवीस यांना २०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर सत्तास्थापनेवेळी काय घडलं. तुमचा महापौर सहज होत असताना तुम्ही ती संधी का सोडली असा प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, '२०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आमचे ८२ नगरसेवक आले. त्यांचे ८४ नगरसेवक निवडून आले. सर्वांशी मी चर्चा केली त्यावेळी सर्वांची मानसिकता होती की भाजपचा महापौर व्हावा. आमचं गणित हे ११९ ते १२१ दरम्यान झालं होतं. कोणाला महापौर बनवायचं याच्या विचारात होतो.'
फडणवीस पुढे म्हणाले, 'एकनाथ शिंदेजी, मिलिंद नार्वेकर हे सातत्याने माझ्या संपर्कात होते. जर आपल्याला एकत्र यायचं असेल तर माझी तयारी आहे. आम्हीला आज नाही उद्या महापौरपद द्या. महापौर राहू दे स्टँडिग कमिटी तरी द्या. आम्ही ८२ आहोत काहीतरी आम्हाला द्या. असं म्हणालो त्यावेळी ते थोड्या वेळाने फोन करतो म्हणायचे. मग फोन यायचा ते म्हणायचे साहेब नाही म्हणत आहेत.'
' मी त्यांना म्हणालो की आमचे ११९ झालेले आहेत. आमचा महापौर बनतोय. आपण एकत्रित आहोत आम्हाला असं करण्याची इच्छा नाही. मला शिंदेनी विनंती केली की उद्धव ठाकरे खूप नाराज आहेत. एका रूममध्ये बंद करून बसलेत. कोणाशी बोलत नाहीयेत. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की यावेळी जाऊ द्या. नका मागू मी त्याचवेळी निर्णय केला.'
फडणवीस म्हणाले, 'मी पाच हा सहकाऱ्यांना त्यावेळी बोलवलं. आशिष शेलार आणि इतर आमची प्रमुख टीम आहे त्यांना बोलवलं. त्यावेळी आम्ही म्हटलं की त्यांना महापौर पद द्यावं. त्यांनी विचारलं की आपण काय घ्यायचं. त्यावेळी मी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला की आपण काहीच घ्यायचं नाही बाहेरून पाठिंबा देऊन मुंबईचे पहारेकरी व्हायचं.'
फडणवीसांनी निर्णय मुंबईतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर सोपवला. ते म्हणाले, 'तुम्हाला पटलं तर असं करू मी हा प्रस्ताव ठेवला आहे. शेवटी तुम्हालाच निर्णय घ्यायचा आहे. त्यानंतर आम्ही मोठी बैठक बोलवून हा विषय ठेवला. सर्वांनी एकमतानं दुजोरा दिला. मी फोन करून शिंदेनां सांगितलं की सगळंच तुम्हाला घ्या आम्ही आमचा निर्णय जाहीर करतोय.'