Devendra Fadnavis (Pudhari Photo)
मुंबई

Devendra Fadnavis : महायुतीचाच हिंदू मराठी होईल मुंबईचा महापौर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, मराठी व्होटबँक आमचीच

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईचे मराठीपण कोणीच घालवू शकत नाही. मुंबईची संस्कृती आणि तिची वाटचाल कायम राहील, त्यात कोणतीच तडजोड होणार नाही. आमच्या पक्षाचा नेता म्हणून अधिकृतपणे सांगतो की, मुंबईचा महापौर महायुतीचा होईल. मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मुंबईचा महापौर मराठीच होईल, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी महापौरपदाबाबतच्या चर्चांवर पूर्णविराम लावला, तर हिंदुत्व आणि मराठी हे वेगळे होऊ शकत नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका खासगी यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील विकासकामे, मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मराठी-अमराठी वादंगासह ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केले. मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी, यावरून तापलेल्या राजकारणात भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याने भर घातली. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, एक तर कृपाशंकर सिंह हे मीरा-भाईंदरमध्ये बोलले, मुंबईत नाही. दुसरे म्हणजे, कृपाशंकर सिंह हे आमचे अधिकृत प्रवक्ते नाहीत. शिवाय, मीरा-भाईंदरमधले त्यांचे विधान माध्यमांनी मुंबईतले म्हणून दाखविले गेले. मात्र, आमच्या पक्षाचा नेता म्हणून मी अधिकृतपणे सांगतो की, मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मुंबईचा महापौर मराठीच होईल.

मुंबईत पूर्वी बाहेरून मजूर यायचे, आता या शहरात वेगवेगळे लोक येतात. पण मुंबईचे मुंबईपण कुणीही घालवू शकत नाही. मुंबईच्या गणेशोत्सवात पारंपरिक मराठी पद्धतीनेच उत्सव साजरा होतो. त्यामुळे मुंबईची संस्कृती ही टिकवायची आहेच. मुंबईची संस्कृती आणि तिची वाटचाल इकडे तिकडे जाऊ देणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मराठी व्होटबँक दुसऱ्यांची आहे, भाजपची नाही हे समजूच नका. मराठी व्होटबँक आमची आहे, हे लक्षात ठेवा. जर मराठी माणसांनी भाजपला मतं दिली नसती तर सलग तीन निवडणुकांमध्ये आमचे उमेदवार इतक्या मोठ्या प्रमाणावर निवडून आले नसते. कुणी काहीही दावा केला तरीही भाजपाच क्रमांक 1 चा पक्ष आहे. मराठी, अमराठी सगळेच आमचे मतदार आहेत. मुंबईचं मराठीपण कुणीहीही घालवू शकत नाही. कुणीही कुठूनही आले तरीही मराठीपण कायम राहणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.

ठाकरे बंधूंच्या युतीबाबत फडणवीस म्हणाले की, या युतीला खूप उशीर झाला आहे. दोघांची मते संपल्यावर हे दोघे एकत्र आले आहेत. 2009 मध्ये एकत्र आले असते तर वेगळा निकाल आला असता. आता एकत्रित येऊन काही फायदा नाही. दोघांच्या मतांची टक्केवारी इतकी कमी आहे की, मराठी माणूस आणि अमराठी माणूस यांना मते देणार नाही. हे दोन भाऊ एकत्र आल्याची आम्हाला काहीही चिंता नाही. आम्ही निश्चितपणे निवडून येऊ. या दोघांचं प्राबल्य एकाच ठिकाणी आहे. तिथे आमची मते हलली नाहीत.त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात अडचणी तयार झालेल्या आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT