मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली त्यातून ते निवडणूक आयोगाचे वकील आहेत की प्रवक्ते ? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी केला.
काँग्रेसने दादरमध्ये चक्काजाम आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवडणूक आयोग व भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सपकाळ म्हणाले की, फडणवीस यांच्यात अहंकार दडलेला आहे, या अहंकराचा दर्प त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे. हे ‘चिफ मिनिस्टर’ नाही चर ‘चिप मिनिस्टर’ आहेत. जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगावर बोलले जाते तेव्हा तेव्हा भाजपा व देवेंद्र फडणवीस यांची तडफड का होते? असा प्रश्न त्यांनी केला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली, हे पुराव्यासह मांडून देशात एकच खळबळ उडवून दिली. निवडणूक आयोगाचा निषेध करण्यासाठी राहुल गांधी यांनी तर्कसंगत मांडणी करून मतदानातील मोठा घोटाळा उघड केला.
या आक्षेपाची चौकशी करण्यासाठी एखादी एसआयटी गठित करायला हवी होती.अथवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे होती. पण राहुल गांधी यांनी पुरावे देत तथ्य मांडूनही केंद्र सरकारने चौकशी करण्याची धमक दाखवली नाही. उलट राहुल गांधी यांनाच प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले, हा आणखी हास्यास्पद प्रकार असल्याचे सपकाळ म्हणाले.
मतचोरीविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्यभर आंदोलन करणार आहे. पदयात्रा काढून हे आंदोलन करण्यात येणार आहे.