मुंबई: आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटकाळात इंधन बचत, परकीय चलनाचे जतन आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देणे ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलेल्या आवाहनात प्रत्येकाने आपले योगदान द्यावे आणि राष्ट्रप्रथम या भावनेने एकसंधपणे उभे राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशव्यापी आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी एक व्हिडिओ जारी करत राज्यातील नागरिकांना या मोहिमेमागची आर्थिक गणिते विस्ताराने सांगितली. पंतप्रधानांच्या या प्रतिपादनामागे इंधन बचत आणि परकीय चलनाची बचत हे दोन मुख्य हेतू आहेत.
आपण मोठ्या प्रमाणात सोने आणि इंधन परदेशातून आयात करतो, त्यामुळे आपल्या देशातील पैसा परकीय चलनाच्या रूपात बाहेर जातो. सध्या आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हे संकट ओढवले आहे. देशाची आर्थिक ताकद मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन सवयींमध्ये छोटे छोटे बदल करून मोठी देशसेवा करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.
त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंचसूत्री सुचविली आहे. ज्यात, नवीन वाहन खरेदी करताना शक्यतो इलेक्ट्रिक वाहनांना (ईव्ही) प्राधान्य द्यावे. शहरांमध्ये सुरू असलेल्या मेट्रो आणि ई-बसेस यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करावा. तसेच, वैयक्तिक कार वापरणे अपरिहार्य असल्यास आसपासच्या मित्रांना सोबत घेऊन कार पूलिंग करावे.
आठवड्यातून किमान एक दिवस नो व्हेईकल डे पाळण्याचा प्रयत्न करावा, असे सुचविले आहे. सोबतच, कोविड काळात आपण सर्वजण घरातून काम करण्यात पारंगत झालो आहोत, गरज भासल्यास कंपन्यांनी तोही पर्याय पडताळून पाहावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यानिमित्ताने केले. घरातील व कार्यालयातील एसीचे तापमान 24 अंश सेल्सिअसच्या खाली ठेवू नये आणि विनाकारण होणारे परदेश दौरे टाळावेत, त्याऐवजी परदेशात राहणाऱ्या आपल्या मित्रांना भारतामध्येच पर्यटनासाठी आमंत्रित करावे, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.