मुंबई : निसर्ग, ऋतूचक्राशी अमीट नातं असलेल्या भारतीय शास्त्रीय संगीतातील रागदारीतील अनमोल स्वरांची बरसात गानविदुषी देवकी पंडित यांनी दिवाळीच्या प्रारंभ पर्वाच्या पूर्वसंध्येला केली. औचित्य होते पुढारी माध्यमसमूह आयोजित दिवाळी संध्या या सांगीतिक मैफलीचे. दादरच्या शिवाजी मंदिरात बुधवारी वसुबारसेच्या पूर्वसंध्येला झालेल्या या मैफलीने रसिक स्वरमुग्ध झाले.
या स्वरमैफलीच्या प्रारंभीच गानविदुषी देवकी पंडित यांनी पूर्वापार चालत आलेल्या अभिजात शास्त्रीय संगीताच्या पंरपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करत मी पूर्वापार चालत आलेल्या याच संगीत परंपरेतून आले. गुरू पं. जितेंद्र अभिषेकी, गानसरस्वती किशोरीताई आमोणकर, पं. बबनराव हळदणकर यांच्यासारख्या गुरूंकडून ज्ञानसंपदा ग्रहण करता आली, हे माझे सौभाग्य आहे, अशी गुरूप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करत देवकी पंडित यांनी या स्वरमैफलीला प्रारंभ केला. गुरू पं. जितेंद्र अभिषेकी यांनी मधुवंती रागातील द्रुत गतीतील पिया बिन मोहे ही सांज प्रहरी गायल्या जाणाऱ्या बंदिशीने मैफलीचा प्रारंभ केला.
सुन पिया अर्ज़ अब मोरी,
जाओ ना जाओ सौतन के घरवा,
सावन की रित कहीं ना मानत ही रचना त्यांनी पेश केली.
या मैफिलीत देवकीताईंनी आपले गुरू पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या आठवणी जागवल्या. पं. जितेंद्र अभिषेकी अर्थात बुवांनी रचलेल्या सर्वंच रचना अजरामर झाल्या आहेत. त्याबाबत वादच नाही, त्यांनी कर्नाटक शैलीतील राग आपल्या नाट्यसंगीतात आणले, केवळ अभिजात संगीतच नाही तर त्या बंदिशींतील भावदर्शन आपल्या कल्पनाशक्तीने खुलवले. त्यामुळेच त्यांच्या गीतांमध्ये नाट्यपदांमध्ये एक वेगळी शैली आपल्याला दिसते. यामुळे पं.अभिषेकींच्या रचना या आधुनिक वाटतात, तरीही त्या रचनांमध्ये अभिजातता ओतप्रोत भरलेली आहे.
आपले गुरू पं. जितेंद्र अभिषेकींच्या गानशैलीची वैशिष्ट्ये देवकी पंडित यांनी उलगडली. नवनिर्मिती करताना त्या संगीतातील अभिजातता राखता आली पाहिजे. हा मिळालेला गुरुमंत्र सांगत त्यांनी आपल्या गुरुंनी अजरामर केलेली कर्नाटक शैलीतील चारुकेशी रागातील हे सुरांनो चंद्र व्हा... हे ययाती आणि देवयान नाटकातील नाट्यपद आपल्या अजोड स्वरात व्यक्त केले. बुवांचे नाट्यपद सगळेच गातात, परंतु बुवांचे हे नाट्यपद गाणे हे माझे कर्तव्य आणि हक्कच आहेच, पण गुरुंनी हा मला दिलेला प्रसाद असल्याचे त्यांनी सांगितले.
कवीवर्य सुधीर मोघे यांची शब्दरचना आणि संगीतकार आनंद मोडक यांनी स्वरबध्द केलेली सदाबहार टवटवीत असलेली सप्तसुरांनो, लयशब्दांनो जगेन तुमच्या साठी ....हे गीत सादर केले. हे गीत म्हणजे गाण्यातील भावार्थ समजून त्याला दिलेली चाल असेल तर ते गीत अजरामर होते आणि ते सादर करावेसे वाटते, अशी या आपल्या गाण्याप्रतीची भावनाही देवकीताईंनी सांगितली. संत मीराबाई यांचे संवादिनी वादक सुधीर नायक यांनी संगीतबध्द केलेले मै तो सावरे हे संत मीराबाईचे भजन पेश केले.
अवघा रंग एक झाला...
रंगी रंगला श्रीरंग....
या संत सोयराबाईच्या अभंगाने मैफलीची सांगता झाली. या मैफलीला तनय रेगे (तबला), हनुमंत रावडे (पखवाज), अभिनय रवांदे (संवादिनी) आणि सुसमिरता दवाळकर आणि मीरा निलाखे यांनी स्वरसाथ केली. पुढारीचे व्यवस्थापक संदीप सावंत यांनी प्रास्तविक केले.
यावेळी रिसर्च आयुच्या डॉक्टर श्रद्धा निकम पुढारीच्या मुंबई जाहिरात विभागाचे प्रमुख श्रीनिवास खांगटे, कॉर्पोरेट जाहिरात प्रतिनिधी सुनील देसाई, राजेश दौंडकर उपस्थित होते.
बुवांचं नाट्यपद हा गुरुंनी दिलेला प्रसाद
नवनिर्मिती करतांना त्या संगीतातील अभिजातता राखता आली पाहिजे, हा मिळालेला गुरूमंत्र सांगत त्यांनी आपल्या गुरूंनी अजरामर केलेली कर्नाटक शैलीतील चारूकेशी रागातील हे सूरांनो चंद्र व्हा ... हे ययाती आणि देवयान नाटकातील नाट्यपद आपल्या अजोड स्वरात पेश केले. बुवांचे हे नाट्यपद सगळेच अनेकदा गातात, परंतू बुवांचं हे नाट्यपद गाणे हे माझे कर्तव्य आणि हक्क आहेच, पण गुरूंनी मला दिलेला हा प्रसाद आहे, अशी कृतज्ञतेची भावना त्यांनी स्वरगुरू पं. अभिषेकी यांच्या बद्दल व्यक्त केली.
पुढारी आयोजित प्रसिद्ध शास्त्रीय गायिका देवकी पंडित आणि शास्त्रीय गायक पं. अजित कडकडे दिवाळी संध्या स्वरमैफल एम. के. घारे प्रस्तुत असून पाॅवर्ड बाय बॅंक ऑफ बडोदा आहे. या मैफलीचे प्रायोजक अदानी, दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी प्रा. लि. रिसर्च आयु आहे. पुढारी न्यूज, पुढारी ऑनलाईन, टॉमेटो एफ. एम. हे माध्यम प्रायोजक होते.