मुलुंड : अनेक महिन्यांची अनिश्चितता आणि सुरक्षिततेच्या चिंतेनंतर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने विक्रोळी येथील धोकादायक घोषित करण्यात आलेला पादचारी उड्डाणपूल (एफओबी) अखेर पाडला. वर्दळीचा रस्ता ओलांडण्यासाठी वापरला जाणारा हा जुनाट पूल बांधकाम, तपासणीत गंभीर संरचनात्मक दोष आढळून आल्यानंतर बंद करण्यात आला होता. त्यामुळे परिसरातील रहिवासी आणि वाहनचालकांना तात्पुरता दिलासा मिळाला.
तथापि, हा दिलासा अल्पकाळ टिकला आहे, पूल पाडल्यानंतर आता नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यायी क्रॉसिंग नसल्यामुळे, पादचाऱ्यांना आता हाय-स्पीड रस्ता ओलांडावा लागत आहे, ज्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. तसेच नवीन एफओबी बांधण्यास किती वेळ लागेल याची अनिश्चितताही नागरिकांच्या चिंतेत भर घालत आहे.
हा उड्डाणपूल पाडल्यानंतर काही धोके देखील रहिवाशांनी निदर्शनास आणले आहेत. पायऱ्यांचे काही भाग अजूनही रस्त्याच्या दोन्ही बाजूला लटकत आहेत. पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले, की नवीन एफओबीची योजना प्रगतीपथावर आहे आणि तात्पुरत्या सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या जातील. निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे आणि काम लवकरच सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.
“प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही पुलाखालून किंवा पुलावरून जात होतो तेव्हा पूल कोसळण्याची भीती असायची,“ असे पुलाचा नियमित वापर करणारे रहिवासी संजय जयस्वाल म्हणाले. मोटारचालकांनीही हीच चिंता व्यक्त केली.
कोणतेही सार्वजनिक पायाभूत सुविधांचे काम लवकर पूर्ण होत नाही आणि जर ते घाईघाईने केले, तर गुणवत्तेला फटका बसतो. सामान्य लोकांसाठी ही एक तोट्याची परिस्थिती आहे. आम्हाला आशा आहे की अधिकारी सुरक्षिततेशी तडजोड न करता नवीन पूल पूर्ण करतील.मयूर गव्हाण, प्रवासी