Mumbai Kabutar Khana Row
मुंबई : दादरच्या कबुतरखान्यावरून सुरू असलेला वाद बुधवारी सकाळी चिघळला. आक्रमक जैन समाजाने कबुतरखान्याजवळ घोषणाबाजी करत ताडपत्री फाडली तसेच बांबूही काढले. या जमावाला रोखण्याचा प्रयत्न पोलीस करत असून यामुळे कबुतरखाना परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
आंदोलन रद्द तरीही जमाव जमलाच
दादर येथे बुधवारी सकाळी जैन समाजाच्यावतीने कबुतरखाना परिसरात आंदोलन केलं जाणार होतं. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी असल्याने सुनावणीनंतर भूमिका घेऊन सभा घेऊ, असं जैन समाजाच्या वतीने सांगण्यात आले होते. कबुतरखाना संदर्भात मंगळवारी मुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक झाली होती. तसेच हायकोर्टातही सुनावणी झाली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर सभा आंदोलन करायचं की नाही हे ठरवल जाईल, अशी प्रतिक्रिया ललित गांधी यांनी दिली होती.
दादरचा कबुतरखाना जवळपास 100 वर्ष जुना आहे. आधी कधी त्रास झाला नाही. मग आत्ताच कसा काय त्रास होतोय?आंदोलक
मात्र, यानंतरही बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास जैन समाज कबुतरखान्याजवळ पोहोचू लागला. अवघ्या काही क्षणात हा जमाव घोषणा देत कबुतरखानाच्या दिशेने गेला. आंदोलनकर्त्या महिलांनी महापालिकेने कबुतरखान्यावर लावलेली ताडपत्री फाडली तसेच बांबूही काढले आणि आत प्रवेश केला.
व्यसनापायी लोकांचा मृत्यू होतो. पण त्यावर काही केलं जात नाही. कबुतरखान्यांमुळे काही होत नाही. गंभीर आजार होतात हा दावाच चुकीचा आहे.महिला आंदोलक
मुक्या जीवाची हत्या करू नका
हा कोणत्याही एका धर्मापुरता विषय नाही. हे मूक पक्षी आहेत. प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. आपल्या संविधानातही याचा उल्लेख आहे. हे कबुतरखाने सुरू झालेच पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मुंबईतील रस्त्यावर फेरीवाल्यांची गर्दी आहे. सुमार दर्जाचे खाद्यपदार्थ रस्त्यावर विकले जातात, पण त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, त्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नाही. आता बिल्डरांच्या दबावापोटी हा कबुतरखाना बंद करण्याचा डाव आहे, असा आरोपही आंदोलकांनी केला आहे.
मंगळवारी झालेली बैठक
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने दादरमधील कबुतरखाना बंद केला होता. मंगळवारी यासंदर्भात जैन समाजाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. कबुतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका प्रशासनाला सबुरीचा सल्ला दिला होता. पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महापालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.