Abhijeet Kelkar: त्यांनी खुशाल आपल्या घरी कबुतर पाळावा; 'कबुतरखाना'वादावर अभिनेत्याची खरमरीत पोस्ट
Abhijeet Kelkar Post On Dadar Kabutarkhana Issue
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने दादर येथील कबुतरखाना शनिवारी बंदिस्त केल्याने वाद निर्माण झाला असतानाच आता अभिनेता अभिजीत केळकरनेही या वादात उडी घेतली आहे. कबुतरमुळे गंभीर आजार होतात हे सिद्ध झालंय. महापालिकेनेही याबाबत वारंवार सूचना केल्या आहेत, तरीही लोकांना अक्कल येत नाही. अशा लोकांनी आपल्या घराला जाळ्या लावून घराच्या आत खुशाल कबुतर पाळावा, अशी खरमरीत पोस्ट अभिजीतने केली आहे.
दादर येथे 1933 पासून कबुतरखाना असून मुंबईकरांच्या आरोग्यासाठी घातक असलेले कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.विधिमंडळात यासंदर्भात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर राज्य सरकारने यासंदर्भात मुंबई महापालिकेला निर्देश दिले होते. यानुसार मुंबई महापालिकेने दादरचा कबुतरखाना बंदिस्त करून कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर कारवाईला सुरूवात केली आहे. यावरून जैन समाज आक्रमक झाला असून मुंबई हायकोर्टातही या निर्णयाविरोधात याचिका दाखल झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर अभिजीत केळकरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत मत मांडले आहे. अभिजीत म्हणतो, काही दिवसांपूर्वी दादरचा हा व्हिडिओ शूट करताना मला भयंकर राग आला होता. भूतदया वगैरे मान्य आहे. पण कबुतरमुळे श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात. या गोष्टी सिद्ध झाल्या आहेत, महापालिकेनेही वारंवार आवाहन केलं आहे. पण तरीही लोकांना अक्कल येत नाही... कबुतर हा पक्षी कुठल्या एका धर्माचा पक्षी त्यांना वाटत असेल तर तो त्यांनी आपल्या घराला जाळ्या लावून, घराच्या आत खुशाल पाळावा. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कुठल्याही पक्षाने, निदान ह्याचे तरी धार्मिक राजकारण करू नये, असं त्याने म्हटले आहे.
अभिजीतच्या या पोस्टचे नेटकऱ्यांनीही समर्थन केले आहे. 'लोकांना लुबाडायचे आणि पाप दूर करण्यासाठी कबुतर, कुत्रे यांना रस्त्यावर खायला द्यायचे त्या पेक्षा आपल्या घरी न्या व पाळा' अशी कमेंट एका युजरने केलीये. इतकंच नव्हे तर एका युजरने यामुळे मैत्रिणीचा मृत्यू झाल्याचा दावाही केला आहे. 'मागच्याच वर्षी माझ्या मैत्रिणीचा मृत्यू झाला. कबुतरांच्या विष्ठेत असणाऱ्या विषाणूमुळे तिचे lungs निकामी झाले', असा दावा एका महिलेने केला आहे.

