दादरला चांगल्या परताव्याच्या आमिषाने दीडशे गुंतवणूकदार फसले! pudhari photo
मुंबई

Mumbai investment scam : दादरला चांगल्या परताव्याच्या आमिषाने दीडशे गुंतवणूकदार फसले!

दहा कोटींच्या फसवणुकीप्रकरणी दोन संचालकांविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : चांगला परताव्याच्या आमिषाने दीडशेहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे दहा कोटीची फसवणूक झाल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सचिन फडतरे आणि निखिल शेलार यांच्यविरुद्ध शिवाजी पार्क पोलिसांनी अपहारासह फसवणुक तसेच बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

यातील तक्रारदार महिला कांदिवलीतील एका खाजगी कंपनीत कामाला असून सध्या ती सायन परिसरात राहते. चार वर्षांपूर्वी त्यांना तिच्या पतीच्या मित्राने संंबधित कंपनीच्या गुंतवणुक योजनेची माहिती दिली होती. त्यापैकी एका योजनेत पाच लाखांची गुंतवणुक केल्यास पाच वर्षांनी साडेबारा लाख रुपये मिळतील असे सांगण्यात आले होते. त्यामुळे ते दोघेही पती-पत्नी दादर येथील निओग्रीन वेंचर प्रायव्हेट लिमिटेड, निओग्रीन अग्रीकल्चर, निओग्रीन होम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात गेले होते.

तिथेच त्यांची सचिन फडतरे आणि निखील शेलार यांच्याशी गुंतवणुकीबाबत सविस्तर चर्चा झाली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेसह तिचे पती आणि आईने सुमारे आठ लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना सहा ते सात महिने नियमित व्याजाची रक्कम मिळाली. मात्र कंपनीने आर्थिक तोटा झाल्याचे सांगून व्याजाची रक्कम बंद केल्याचा खुलासा केला होता. या प्रकारानंतर अनेक गुंतवणुकदारांनी कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली होती.

यावेळी कंपनीने सर्वांना तीन महिन्यांत मुद्दलसह व्याजाची रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी गुंतवणुकदारांना काही धनादेश देण्यात आले होते. चौकशीदरम्यान कंपनीने दिडशेहून अधिक गुंतवणुकदारांकडून सुमारे दहा कोटी रुपये घेतले होते. मात्र कंपनीने कोणालाही मूळ रक्कमेसह परतावा दिला नाही. हा प्रकार निदर्शनास येताच तक्रारदार महिलेसह इतर गुुंतवणुकदारांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

याबाबत त्यांनी पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार करुन कंपनीच्या मालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सचिन फडतरे आणि निखील शेलार यांच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

  • सचिन फडतरे आणि निखिल शेलार हे दोघेही निओग्रीन वेंचर प्रायव्हेट लिमिटेड, निओग्रीन अग्रीकल्चर, निओग्रीन होम्स प्रायव्हेट लिमिटेडसह इतर कंपनीचे मालक आणि संचालक आहेत. फसवणुकीचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कंपनीकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी शिवाजी पार्क पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT