मुंबई : भारतीय रेल्वेने कोकणवासियांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन नियमित दैनिक एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार आज ३ सप्टेंबर रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित या गाडीला दुपारी १२ वाजता हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला जाणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधी आणि कोकणवासियांकडून आग्रही मागणी करण्यात आली होती. या नव्या रेल्वेगाडीमुळे चाकरमान्यांचा गणपती आणि इतरही सणाला कोकणात जाण्याचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
मुंबई ते सावंतवाडी सुमारे ५१० किमीच्या मार्गावर धावणारी गाडी क्रमांक १५०८७ सीएसएमटी ते सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड ते सीएसएमटी एक्स्प्रेस या नव्या रेल्वेगाड्या आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
या नवीन एक्स्प्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
येत्या १४ सप्टेंबरपासून सुरू होणारा गणपती उत्सव आणि त्यानंतर पुढे नवरात्री, महाशिवरात्री, होळी-धुळवड तसेच मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही गाडी अतिशय महत्वाची ठरणार आहे.