मुंबई ः नरेश कदम
काँग्रेस प्रदेशाध्यक्षासह प्रदेश काँग्रेसमध्ये केलेले संघटनात्मक बदल नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या पथ्यावर पडले आहे. सत्तारूढ महायुतीतील भाजपसह तिन्ही पक्ष जोमाने लढत असताना विरोधी महाविकास आघाडीतील केवळ काँग्रेसने ही निवडणूक गांभीर्याने लढवली, निवडणुकीपूर्वी संघटनात्मक बदल केले, त्यामुळे त्यांच्या पदरात यश आले. परिणामी महाविकास आघाडीत पिछाडीवर असलेल्या काँग्रेसचा भाव वधारला.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. पण त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीतील घटक पक्षातही कमी जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यानंतर प्रदेश काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल केले. हर्षवर्धन सपकाळ हे नवखे आहेत, त्यांना फारसे कोणी ओळखत नाही, अशी त्यांची हेटाळणी भाजपच्या नेतृत्वाने केली होती. परंतु काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांप्रमाणे ते भाजपच्या आहारी गेले नाहीत. पैसे आणि नेतृत्वाचा तितकासा वकुब नसताना त्यांनी प्रयत्न केले.
विदर्भात 23 नगराध्यक्ष काँग्रेसचे जिंकले आहे. यात चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्ह्यातील 11 पैकी 8 नगराध्यक्ष निवडून आणले. अमरावती विभागात प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या बुलढाणा जिल्ह्यात तीन नगराध्यक्ष, यवतमाळमध्ये 3 आणि अमरावतीत 2 नगराध्यक्ष निवडून आले. वर्धात डोंक नगराध्यक्ष जिंकले.
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र , पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मात्र काँग्रेसच्या नेत्यांची कामगिरी खराब झाली आहे. अमित देशमुख यांच्या लातूर जिल्ह्यात काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. नांदेडमध्ये 2, छत्रपती संभाजी नगर 2 आणि परभणीत 1 असे पाच नगराध्यक्ष मराठवाड्यात निवडून आले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उत्तर महाराष्ट्रातही काँग्रेसची वाताहत झाली. धुळे जिल्ह्यात 1 आणि अहिल्यानगर जिल्ह्यात 1 असे अवघे दोन नगराध्यक्ष जिंकले. यात थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातील नगरपालिकेत काँग्रेस हात चिन्हावर लढली नाही. भाजप पुरस्कृत नेते सत्यजित तांबे यांनी आघाडी केली . त्यांचा नगराध्यक्ष विजयी झाला. पण काँग्रेसने आपल्या विजयी नगराध्यक्षांच्या यादीत त्यांना स्थान देण्यास नकार दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात दोन नगराध्यक्ष निवडून आणून काँग्रेस तेवत ठेवली आहे. सांगलीत विश्वजीत कदम यांच्या जिल्ह्यात एक नगराध्यक्ष निवडून आला, तर कोकणात केवळ एक नगराध्यक्ष निवडून आला आहे. या निवडणुकीतील यशामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचा भाव वाढला आहे.