

मुंबई : मुंबई व ठाणे महापालिकेत युती करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असताना दोन्ही पक्षांत जागावाटपात रस्सीखेच सुरू आहे. युतीबाबत अंतिम तोडगा निघाला नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. कोणत्या जागा कोणाला जाणार याबाबत स्पष्टता नसल्याने दोन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत.
राज्यात अन्य ठिकाणी झाली नाही तरी मुंबई, ठाण्यात युती करण्याबाबत भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सध्या मुंबई व ठाण्यात युती करण्याबाबत बोलणी सुरू आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत 50 टक्के जागा मिळाल्या तरच युती करण्याची भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेत स्वबळावर लढायची तयारी केली आहे. त्यासाठी अन्य पक्षांतील पदाधिकाऱ्यांना पक्ष प्रवेश दिले आहेत, तर नवी मुंबई महापालिकेतही वनमंत्री गणेश नाईक हेही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे सध्या तरी मुंबई आणि ठाण्यात युती होण्याची शक्यता दिसत आहे.
भाजप मुंबईत शिंदेंना 65 ते 70 जागा सोडण्यास तयार असून काही झाले तरी 150पेक्षा जास्त जागा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ठाण्यात युती झाल्यास भाजपला 40 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. त्यामुळे स्थानिक भाजप पदाधिकारी नाराज आहेत. युती करण्यापेक्षा स्वबळावर लढा, असा त्यांचा आग्रह आहे. मात्र मुंबईत भाजपला मनासारख्या जागा मिळाल्या तर ठाण्यात शिंदेंच्या मनाप्रमाणे जागावाटप करण्याची भाजपची रणनीती आहे.
मुंबईत शिवसेनेने ताणून धरल्यास ठाण्यात भाजप जास्तीच्या जागेचा आग्रह
धरू शकते. ठाणे भाजपकडून प्रदेश भाजपने सोमवारी सुधारित प्रस्ताव मागवला आहे. त्यात ठाण्याच्या मध्यवर्ती भागातील युतीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भागात भाजपने काही जागा मागितल्या आहेत. मुंबईत एकनाथ शिंदे यांनी अनेक माजी नगरसेवकांना पक्षप्रवेश दिले आहेत. त्यांना निवडणुकीत तिकिटे मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, भाजपने मुंबईत ताणून धरल्याने अनेकांची उमेदवारी अधांतरी आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक इच्छुकांनी सोमवारी ठाण्याचा रस्ता धरत शिंदेंच्या घरासमोर गर्दी केली होती.