मुंबई

Mumbai Water Shortage : मुंबईत पाणी वितरणामध्ये घोळ! नागरिकांना करावा लागतोय पाणीटंचाईचा सामना

backup backup

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पाणी वितरणमध्ये असलेल्या घोळामुळे मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. घाटकोपर, भांडुप, जोगेश्वरी, कुर्ला, कांदिवली, दहिसर, चारकोप आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी विभाग कार्यालयात नागरिकांनी केले आहेत. नेमकी पाणीटंचाई कशामुळे याचा शोध घेण्याचा पालिकेचा जल अभियंता विभाग प्रयत्नशील आहे. मात्र यात फारसे यश आलेले नाही. (Mumbai Water Shortage)

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा, मोडकसागर, भातसा, अप्पर वैतरणा, तुळसी, विहार व मध्य वैतरणा तलावात ऑगस्ट 2023 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असतानाही मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पश्चिम व पूर्व उपनगरातील नागरिकांना या पाणीटंचाईचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतच्या दररोज विभाग कार्यालयात किमान आठ ते दहा तक्रारी येतात. काही भागात पाणी आले तरी त्याचा दाब कमी असल्यामुळे एक घागर भरायला दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाण्याची एक घागर मिळवण्यासाठी अक्षरश: अर्धा ते पाऊण तास वाया जात आहे. याचा सर्वाधिक फटका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बसत आहे. घाटकोपर सर्वोदयनगर व आजूबाजूच्या परिसरात गेल्या एक दोन महिन्यापासून पाणीटंचाई भासत आहे. याबाबत तक्रार केली असता जलवाहिनीला बसवण्यात आलेली चावीच पूर्णपणे उघडली जात नसल्याचे लक्षात आले. (Mumbai Water Shortage)

जोगेश्वरी, अंधेरी आदी भागातही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. वेरावली जलाशयामध्ये पाण्याची लेवल राखली जात नसल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. पाणीटंचाईचे मुख्य कारण जलवाहिनीमधून होणारी पाण्याची गळती व चोरी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पण याकडे पालिकेकडून गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी टंचाई भासत आहे. दरम्यान काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे पालिकेच्या जल अभियंता विभागातील अभियंत्याने मान्य केले. काही तांत्रिक अडचणीमुळे अशा समस्या काही विभागात उद्भवतात मात्र त्या तातडीने सोडवल्या जातात. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर ती तातडीने सोडवण्यासाठी त्या त्या विभाग कार्यालयातील जलअभियंता विभागाचा प्रयत्न असतो, असेही या अभियंत्यांनी स्पष्ट केले.

परळ येथील पाणीटंचाई दूर !

परळ येथील शापूरजी कंपाऊंड डॉ. एस. एम. राव रोड गुरुनानी चौक येथे जलवाहिनी फुटल्यामुळे या भागातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र दोनच दिवसांपूर्वी जलवाहिनी विभागाने या जलवाहिनीमधून होणारी पाणी गळती थांबवल्यामुळे या भागातील पाणीटंचाई दूर झाली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT