Maharashtra FYJC Admission Pudhari
मुंबई

Maharashtra FYJC Admission: अकरावी प्रवेश संकेतस्थळावर जुनीच माहिती; विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम

मार्गदर्शन केंद्रांची यादीही गेल्यावर्षीची; अर्ज प्रक्रिया, कागदपत्र पडताळणी, प्रवेश वेळापत्रकाबाबत गोंधळ होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ सुरू झाले असले, तरी त्यावर अद्याप गेल्या वर्षीचीच माहिती दिसत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर ‌‘इन्फॉर्मेशन बुकलेट 2025-26‌’ तसेच मागील वर्षातील मार्गदर्शन केंद्रांची यादी उपलब्ध असल्याचे समोर आले आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या अकरावीच्या प्रवेश संकेतस्थळावरील डाउनलोड विभागात ‌‘गाईडन्स सेंटर लिस्ट (इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 मार्गदर्शन केंद्र)‌’ अशीच जुनी लिंक दिसत आहे.

तसेच मुख्य माहिती पुस्तिकेवरही ‌‘स्टँडर्ड 11टीएच सेंट्रलाइज्ड ऑनलाइन ॲडमिशन प्रोसेस 2025-26‌’ असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती नेमकी कधी उपलब्ध होणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

अशा परिस्थितीत जुनी माहिती कायम असल्याने अर्ज प्रक्रिया, मार्गदर्शन केंद्रे, कागदपत्र पडताळणी आणि प्रवेश वेळापत्रकाबाबत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेपूर्वी संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करून विद्यार्थ्यांना स्पष्ट आणि अचूक माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची माहिती वेळेत मिळत नसल्याने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थी दहावीत असताना शाळास्तरावर प्रवेशासंदर्भातील मार्गदर्शन पूर्वी केले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांत ही व्यवस्था जवळपास बंद पडल्याचे चित्र आहे. परिणामी यंदाही प्रवेश प्रक्रियेत गोंधळाची मालिका सुरू असल्याची टीका पालक व विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.

दरवर्षी सुमारे विद्यार्थ्यांकडून प्रवेश नोंदणी शुल्काच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जमा होतात. मात्र त्या तुलनेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन, कार्यशाळा किंवा शाळास्तरीय सहाय्य मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे यंदा मुंबई विभागात पंधरावे वर्ष सुरू असताना अजूनही मूलभूत मार्गदर्शनाचा अभाव असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

पूर्वी माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे, माहिती पडताळणी, अर्ज मंजुरी आणि पसंतीक्रमाविषयी मार्गदर्शन केले जात होते. शिक्षण उपसंचालकांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण यंत्रणा कार्यरत होती. मात्र आता ही जबाबदारी माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडे गेल्यानंतर स्थानिक पातळीवरील समन्वय कमी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे, आरक्षणासंदर्भातील नियम, अर्ज प्रक्रिया, पसंतीक्रम भरण्याची पद्धत याबाबत अनेक विद्यार्थ्यांना अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. प्रवेश अर्ज कसा भरायचा, मार्गदर्शन केंद्रावर कधी जायचे, प्रवेश मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया काय असते, याबाबत अनेक पालक व विद्यार्थी संभ्रमात आहेत.

अकरावी प्रवेश रामभरोसे

1. पूर्वी शाळास्तरावर विद्यार्थी व पालकांसाठी कार्यशाळा घेतल्या जात होत्या. त्या आता बंद झाल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेचे नियोजन आणि मार्गदर्शन व्यवस्थित व्हावे यासाठी आवश्यक तयारी झालेली दिसत नाही. मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रियाही अपुरी असल्याची तक्रार आहे.

2. प्रवेशाची माहिती पुस्तिका केवळ ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाते. अनेक पालकांना ती कुठे मिळते हेही माहिती नसते. विद्यार्थीही संपूर्ण पुस्तिका वाचत नाहीत. त्यामुळे गोंधळ वाढत आहे. दहावीच्या परीक्षेनंतर छापील पुस्तिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

3. अर्ज प्रक्रियेत विविध टप्पे आहेत. मात्र पसंतीक्रम कसा भरायचा याचे योग्य मार्गदर्शन नसल्याने कमी गुण असलेले विद्यार्थीही नामांकित महाविद्यालयांचेच पर्याय भरतात. त्यामुळे प्रवेश न मिळाल्यास गोंधळ निर्माण होतो.

4.आरक्षण, प्रवर्गनिहाय अटी आणि आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती नसल्याने अनेक पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचणी येतात. कागदपत्रांअभावी प्रवेश गमवावा लागू नये यासाठी पूर्वीच मार्गदर्शन होणे आवश्यक असल्याची मागणी पालकांनी केली आहे.

नोंदणी शुल्क एजन्सीच्या घशात?

दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 100 रुपये नोंदणी शुल्क घेतले जाते. या शुल्कातून कोट्यवधी रुपयांचा निधी जमा होत असतानाही विद्यार्थ्यांना पुरेसे मार्गदर्शन दिले जात नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाकडून नोंदणी शुल्क एजन्सीच्या घशात घालण्यासाठी घेण्यात येते का असा सवालही उपस्थित होत आहे. ऑनलाइन परिपत्रके प्रसिद्ध केली जात असली, तरी अनेक पालक आणि विद्यार्थ्यांना त्याची माहितीच नसते. परिणामी प्रवेश प्रक्रियेदरम्यान उपसंचालक कार्यालयाबाहेर तक्रारींसाठी पालकांच्या रांगा लागतात, असे चित्र दरवर्षी दिसून येते.

तांत्रिक समस्या समजून न घेता एकतर्फी आदेश दिले जात आहेत त्यामुळे विद्यार्थी व पालक मानसिक त्रास सहन करत आहेत त्यामुळे योग्य मार्गदर्शन आणि ग्राउंड लेव्हल साठी स्पष्ट मार्गदर्शक सुचना आणि वारंवार येणारे प्रश्न, शंका याबाबत योग्य लेखी सुचना तसेच हेल्प लाईन उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे.
-महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष मुख्याध्यापक संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT