मुंबई : राज्यातील खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी राज्य शासनाने सुधारित आणि सर्वसमावेशक योजना लागू केली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील सविस्तर शासननिर्णय जारी करत, याआधीच्या सर्व शासननिर्णय व मार्गदर्शक सूचना रद्द केल्या आहेत.
राज्यभरात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शाळांना ही नियमावली लागू राहणार असून, स्वयंअर्थसहाय्यित आणि विनाअनुदानित शाळांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. सेवेत कार्यरत असताना शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी निधन झाल्यास, त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यास मानवतावादी दृष्टिकोनातून आधार देण्यासाठी गट-क किंवा गट-ड मधील सरळसेवेच्या कोट्यातील मंजूर व रिक्त पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
दिवंगत कर्मचाऱ्याचा पती किंवा पत्नी जर आधीच शासकीय, निमशासकीय किंवा अनुदानित सेवेत कार्यरत असेल, तर त्या कुटुंबास अनुकंपा नियुक्तीचा लाभ मिळणार नाही. तसेच, 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ नाकारण्यात आला आहे. सेवेत असताना बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याला सक्षम न्यायालयाने मृत घोषित केल्यास, त्याच्या कुटुंबालाही अनुकंपा नियुक्तीचा अधिकार राहील, अशी स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे.
अनुकंपा नियुक्ती फक्त गट-क आणि गट-ड मधील मंजूर व रिक्त पदांवरच देता येणार आहे. गट-ड (चतुर्थ श्रेणी) पदे टप्प्याटप्प्याने व्यपगत करण्यात येत असली, तरी शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत अशी पदे रिक्त झाल्यास प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षक संवर्गातील पदासाठी थेट नियुक्ती न करता, प्रचलित शिक्षण सेवक योजना लागू राहील, तसेच शिक्षक पात्रता परीक्षा व आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेत होणारी दिरंगाई टाळण्यासाठी शासनाने कडक तरतुदी केल्या आहेत. सक्षम प्राधिकाऱ्यांच्या शिफारशीशिवाय शाळा व्यवस्थापनाने थेट अनुकंपा नियुक्ती केल्यास ती अमान्य ठरणार असून, संबंधित व्यवस्थापनावर महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवेच्या अटी) अधिनियम तसेच अन्य कायद्यांनुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. भविष्यात अनुकंपा नियुक्तीसाठी ऑनलाईन अर्ज, प्रतीक्षा यादी व शिफारस प्रक्रिया सुरू करण्याचा मानस शासनाने व्यक्त केला आहे. तोपर्यंत ऑफलाईन पद्धतीने या योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील सर्व सक्षम प्राधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
दिवंगत झालेल्या शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील कायदेशीर पत्नी अथवा पतीला अनुकंपा नियुक्तीसाठी प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. पत्नी किंवा पती उपलब्ध नसल्यास, अथवा त्यांनी नियुक्ती नाकारल्यास, मुलगा किंवा मुलगी (विवाहित किंवा अविवाहित) तसेच मृत्यूपूर्वी कायदेशीररीत्या दत्तक घेतलेला मुलगा किंवा मुलगी पात्र ठरू शकतात. याशिवाय घटस्फोटित, परित्यक्ता किंवा विधवा मुलगी अथवा बहीण यांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. दिवंगत कर्मचाऱ्याचा मुलगा हयात नसल्यास, त्याची सून अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र राहील. तसेच, कर्मचारी अविवाहित असल्यास आणि त्याच्यावर पूर्णतः अवलंबून असलेला भाऊ किंवा बहीण यांचाही विचार केला जाणार आहे.
एका व्यवस्थापनाखालील, त्या जिल्ह्यातील शाळांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा यादी ठेवली जाणार असून, दुसरी प्रतीक्षा यादी जिल्ह्यातील सर्व खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसाठी असेल. ज्येष्ठतेनुसार व पात्रतेनुसार नियुक्ती देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, संबंधित शाळेत पद उपलब्ध नसल्यास त्याच व्यवस्थापनाच्या किंवा जिल्ह्यातील इतर शाळांमध्ये नियुक्ती देण्यात येणार आहे.