

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांच्या पार्थिवावर गुरुवारी वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
पिंकी माळी यांचे पार्थिव आधी सासरी कळवा येथे नेण्यात आले. त्यानंतर माहेरी वरळी येथील सेंचुरी म्हाडा संकुलात आणण्यात आले. तेथून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी नातेवाईक, मित्रमंडळी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पिंकी माळी यांचा तीन वर्षांपूर्वीच सौमिक सैनी यांच्याशी विवाह झाला होता. पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून ते टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पिंकी यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील असून, अस्थी विसर्जनासाठी बनारस येथे नेण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
वडील शिवकुमार माळी यांच्यासोबत मंगळवारी पिंकीचे शेवटचे बोलणे झाले होते त्यावेळेस तिने अजित पवार यांच्या समवेत बुधवारी विमानातून बारामतीला जाणार असल्याचे वडिलांना सांगितले होते. पवार यांना बारामतीला सोडल्यानंतर पिंकी नांदेडला हॉटेलवर जाऊन फोन करणार असल्याचे वडील शिवकुमार माळी यांना सांगितले होते.
शिवसेनेचे समाधान सरवणकर यांनी शिवकुमार माळी यांना बुधवारी सकाळी फोन केला होता. परंतु कॉल कट झाल्यामुळे शिवकुमार माळी यांनी टीव्ही चॅनल सुरू केल्यावर त्यांना पिंकीचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समजली होती.