Cyber Crime Pudhari
मुंबई

Cyber Crime: ग्रुप चॅटद्वारे कंपनीच्या खात्यात २.३० कोटींचा डल्ला; दक्षिण मुंबईतील प्रकार

अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटीचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: दक्षिण मुंबईतील एका नामांकित कंपनीतील अधिकाऱ्यांचा ग्रुप चॅट बनवून अज्ञात सायबर ठगांनी कंपनीच्या बँक खात्यातून २ कोटी ३० लाखांचा डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी ठगांचा सायबर सेलकडून शोध सुरु आहे.

परमेश्वरन महादेव अय्यर (६४) हे डोबिवलीतील दावडी व्हिलेज रोड परिसरात राहतात. सध्या ते नरिमन पॉईट येथील अपार इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनीत सिनिअर मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्यावर कंपनीच्या सर्व आर्थिक व्यवहाराची जबाबदारी असून ते कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विनायक लेले यांना रिपोर्ट करतात.

३१ जुलै २०२६ रोजी त्यांना एका ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले होते. त्यात त्यांच्यासह विनायक लेले यांच्यासह कंपनीचे दोन प्रमुख संचालक चैतन्य देसाई आणि कुशल देसाई यांचा समावेश होता. या ग्रुपमध्ये सामिल होण्यापूर्वी दोन्ही संचालकामध्ये एका कॉन्ट्रक्टविषयी चर्चा झाली होती.

त्यानंतर कुशल देसाई यांनी संबंधित चर्चेची माहिती सांगून विनायक लेले यांच्याकडे कंपनीच्या खात्यातील बॅलेन्सची माहितीची विचारणा केली होती. त्यानंतर त्यांनी एका पार्टीला काही पेमेंट पाठविण्यास सांगितले होते. त्यांच्या आदेशानंतर संबंधित पार्टीला दोन कोटी तीस लाख रुपयांचे पेमेंट करण्यात आले होते. या पेमेंटनंतर त्याची कॉपी त्यांनी लेलेसह कंपनीच्या संचालकांना पाठविले होते.

अज्ञात सायबर ठगांनी ग्रुप चॅट तयार करुन त्यात कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्ऱ्यांना ॲड करुन संचालकाच्या नावाने एका पार्टीला दोन कोटी तीस लाख रुपये पेमेंट करण्यास प्रवृत्त करुन कंपनीची फसवणुक केली होती.

हा प्रकार लक्षात येताच कंपनीच्या वतीने परमेश्‍वरन अय्यर यांनी दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ज्या दोन बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्यासह खातेदाराची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिीसांनी सांगितले.

पेमेंटबाबत विचारणा केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस

हा प्रकार नंतर कंपनीतील अर्पण शहा यांच्या लक्षात आला होता. त्यांनी दिवसभरातील व्यवहाराची पाहणी केल्यानंतर बंधन बँकेच्या एका खात्यात दोन कोटी तीस हजार रुपये ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी परमेश्वरन अय्यर यांच्याकडे विचारणा केली होती. त्यांनी ते पेमेंट विनायक लेले आणि कुशल देसाई यांच्या सांगण्यावरुन केल्याचे सांगितले. त्यामुळे अर्पण शहा याने कुशल देसाई यांच्याकडे पेमेंटबाबत विचारणा केली होती. त्यांनी कुठल्याही पार्टीला पेमेंट करण्यास सांगितले नाही, तसेच कंपनीच्या कुठल्याही नवीन ग्रुपमध्ये नसल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT