मुंबई : ‘सायबर योद्धा’ या लहान मुलांच्या कॉमिक्स बुकलेटचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेता अक्षय कुमार. pudhari photo
मुंबई

CM Fadnavis : तिसरीपासून देणार सायबर सुरक्षेचे धडे

मुख्यमंत्री फडणवीस; सायबर सुरक्षेतही गोल्डन अवर महत्त्वाचा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गोल्डन अवरमध्ये उपचार मिळाल्यास अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणे शक्य होते. सायबर फसवणुकीतही गोल्डन अवर महत्त्वाचा आहे. जितक्या लवकर सायबर फसवणुकीची तक्रार द्याल, तितक्या लवकर फसवणूक झालेली रक्कम परत मिळविणे सोपे जाणार आहे. त्यामुळे विनाविलंब तक्रारी करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील पोलीस मुख्यालयात सायबर जनजागृती उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान इयत्ता तिसरीपासून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे देण्याचा विचार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी अभिनेते अक्षय कुमार, अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यासह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. सायबर जनजागृतीसाठी शालेय मुलांनी काढलेल्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, रस्त्यांवरील गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांचा धोका वाढत आहे.

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्राने देशातील सर्वांत चांगले सायबर क्राईम सेंटर उघडले असून त्याचे कामही चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मात्र, सायबर गुन्हे घडूच नयेत, यासाठी जनजागृती करणे अधिक महत्त्वाचे आहे. मानसिक त्रासाची भरपाई अवघड असते, त्यामुळे जनजागृती हाच उपाय असल्याने नव्या डिजिटल युगाची नवी डिजिटल मूल्ये विकसित करावी लागतील, असे फडणवीस म्हणाले.

सोशल मीडिया, ऑनलाईन व्यवहार, पेमेंट्स यामध्ये आपण माहिती देतो. कुकीज स्वीकारल्यानंतर वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो. यावरून स्कॅम, एक्स्टॉर्शन, सायबर बुलिंग यांसारखे प्रकार घडतात. मात्र यासाठी वेळेवर तक्रार होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे क्षमता आणि जनजागृती दोन्ही समान महत्त्वाची आहेत. युवकांपर्यंत सायबर सुरक्षिततेबाबत माहिती पोहोचवणे आवश्यक असून, या कार्यात कम्युनिकेटर्सची महत्त्वाची भूमिका आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सायबर गुन्हे हे मोठे आव्हान

सायबर आणि डिजिटल स्पेसमध्ये आता ए.आय. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आल्यामुळे गुन्ह्यांच्या संभावना वाढल्या आहेत. त्यावर जनजागृती हा उपाय असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. ए.आय.ने निर्माण केलेली आव्हानेसुद्धा ए.आय.चा उपयोग करूनच दूर करता येतील. सायबर गुन्हे हे मोठे आव्हान आहे; मात्र जेव्हा लोकशाहीपुढे अशी आव्हाने निर्माण होतात, तेव्हा त्याची उत्तरे याच व्यवस्थेने शोधून काढली आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले.

  • अभिनेता अक्षय कुमार याने त्याची मुलगी नितारा हिच्यासोबत झालेल्या ऑनलाईन गेमिंगच्या घटनेबद्दल अनुभव शेअर करत सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेमिंग किती घात ठरू शकते याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सोशल मीडियावर वैयक्तिक फोटो शेअर करू नका, असे आवाहनही केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT