

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवरून उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप करून नव्या वादाला तोंड फोडणारे शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांचा ठाकरे गटाकडून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. कदम यांचे वक्तव्य म्हणजे ज्यांनी त्यांना मोठे केले त्या बाळासाहेबांशी बेईमानी करण्यासारखे आहे. भुंकणार्या श्वानाला कुणी किंमत देत नाही, त्यामुळे त्यांचा स्वभाव हा खोटे बोल, पण रेटून बोल...यासारखा असून त्यानुसार ते बोलले, असे प्रत्युत्तर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून देण्यात आले. दरम्यान, कदमांच्या वक्तव्यांवर विविध समाजमाध्यमांवर त्यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कदम यांचा चांगलाच समाचार घेतला. नगरसेवक, आमदार, मंत्री राहिलेल्या कदम यांनी मुंबईसाठी काय केले, असा सवाल करत एकीकडे शिवसेनाप्रमुखांचे शिवसैनिक म्हणायचे आणि त्याच शिवसेनाप्रमुखांवर अश्लाघ्य भाषेत टीका करायची, असा संताप व्यक्त करत कदम यांचे वर्तन अतिशय घाणेरडे असून छमछम बारमध्ये महिलांनी कमवलेले पैसे स्वतः उडवायचे, असे धंदे कदम यांनी केले आहेत. अशा व्यक्तीकडून कृतज्ञता व्यक्त होणार नाही, अशी टीका जाधव यांनी केली. शिवसेना पक्ष फुटून तीन वर्षे झाली. मात्र तीन वर्षांत कदम यांना कोणीही भाषण द्यायला, विचार मांडायला नेता म्हणून कुणी बोलावले नाही. त्यामुळे अशा मेळाव्यातून भुंकल्याशिवाय त्यांच्यासारख्या श्वानाला कोणी किंमत देत नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.
रामदास कदम यांच्या तोंडात भीतीपोटी कुणीतरी शेण कोंबले असेल आणि आता ते उगाळत असतील तर त्याला काय करणार. शिवसेनाप्रमुखांना जाऊन एक दशक लोटला. त्यांना आता शंभर वर्षे होतील. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे ज्यांनी त्यांना आणि आम्हाला मोठे केले, त्या बाळासाहेबांशी बेइमानी असल्याची संतप्त टीका खासदार संजय राऊत यांनी केली. ज्यावेळेस शिवसेनेकडून सत्तेची फळे चाखली, मंत्रिपदे उपभोगली, त्या वेळेस या गोष्टी का आठवल्या नाहीत, असा सवाल करत ही नमक हरामी आहे, असा संताप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला, तर कदम यांचे सर्व आरोप खोटे असून तो फालतू माणूस आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सुनावले.