मुंबई

Parth Pawar Land Fraud : समोर आलेले मुद्दे अत्यंत गंभीर : पार्थ पवारांवरील आरोपांबाबत CM फडणवीस नेमकं काय म्‍हणाले?

महसूल विभागासह भूमिअभिलेख विभागाकडून संपूर्ण माहिती मागवल्‍याची स्‍पष्‍टोक्‍ती

पुढारी वृत्तसेवा

Parth Pawar Land Fraud : पुण्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरणी प्रथमदर्शनी समोर आलेले काही मुद्दे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. पार्थ पवारांवर झालेल्‍या आरोपांच्या संदर्भात महसूल विभाग आणि भूमिअभिलेख विभाग या दोन्हींकडून संपूर्ण माहिती मागवली आहे. या माहितीच्या आधारे चौकशीचे आदेश दिले आहेत. यानंतरच अधिकृत भूमिका मांडली जाईल, असे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. ६) माध्‍यमांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

पार्थ पवारांवर दानवे, वडेट्टीवारांचे गंभीर आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या 'अमेडिया' कंपनीने पुणे येथील कोरेगाव पार्क परिसरात कथितपणे नियम डावलून 40 एकर 'महारवतना'ची जमीन खरेदी केली आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे शिवसेना नेते अंबादास दानवे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. रिपब्लिकन पार्टी (खरात गट) ने या संपूर्ण प्रकरणाच्या न्यायिक चौकशीची मागणी केली आहे.

...तर निश्चितच कारवाई : मुख्‍यमंत्री

पार्थ पवारांवरील आरोपांबाबत बोलताना मुख्‍यमंत्री फडणवीस म्‍हणाले की, "या प्रकरणी प्रथमदर्शनी समोर आलेले काही मुद्दे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे सर्व माहिती मिळाल्यानंतरच मी या विषयावर सविस्तर भाष्य करणार आहे. कुठेही अनियमितता झालेली असेल, तर त्यावर निश्चितच कारवाई केली जाईल. आमचे महायुती सरकार पारदर्शकतेवर विश्वास ठेवते, त्यामुळे या प्रकरणात अनियमितता आहे की नाही, हे पडताळून पाहिले जाईल आणि असल्यास कठोर कारवाई केली जाईल."

उद्धव ठाकरे जेथे जातात तिथे लोक पाठ फिरवतात

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर बोलताना फडणवीस म्‍हणाले की, मला आनंद आहे की ते घराबाहेर पडले आहेत. ते मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांवर संकट आले होते, तेव्हा त्यांनी कारपेट खाली उतरून लोकांमध्ये जाण्याचे टाळले होते. आता सततच्या राजकीय पराभवांमुळे त्यांना लोकांमध्ये जाण्याची गरज जाणवू लागली आहे; पण आपणच पाहत आहात की, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे जात आहेत, तिथे लोक पाठ फिरवत आहेत. त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच त्यांचा दौरा सुरू आहे.शेतकऱ्यांना सरकारचे मदतपॅकेज मिळत आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. काही ठिकाणी तर लोकांना पकडून त्यांच्या सभांमध्ये आणावे लागत आहे. राज्यात काही ठिकाणी पॅकेजचे पैसे सध्या पोहोचले नसतील, पण दररोज सुमारे 600 कोटी रुपये आरबीआयच्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत, असेही फडणवीसांनी सांगितले.

राहुल गांधींचे आरोप आंतरराष्‍ट्रीय अजेंड्याशी संबंधित

राहुल गांधी यांनी मतचोरीबाबत केलेल्‍या आरोपावर बोलताना फडणवीस म्‍हणाले की, राहूल गांधी जेव्हा “हायड्रोजन बॉम्ब” म्हणतात, तेव्हा तो फुसका ठरतो, हे याआधी सिद्ध झाले आहे. बुधवारी (दि. ५) त्यांनी दाखवलेला फोटो हा मॉर्फ केलेला असल्याचे काही माध्यमांनी उघड केले आहे. त्या फोटोतले काही मतदारांची ओळख पटवली गेली असून, त्या मतदारांचा शोधही माध्यमांनी घेतला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची ही मोहीम लोकशाहीला डळमळीत करण्याच्या आंतरराष्ट्रीय अजेंड्याशी संबंधित असल्याचा संशय उपस्थित होत आहे. भारताच्या लोकशाहीवर आणि सविधानाने उभारलेल्या संस्थांवर जनतेचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही फडणवीसांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT