

कोल्हापूर : डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पत्रकारितेचा व्रतस्थ वसा जपला. त्यातून जनतेनेच त्यांना पुढारपण बहाल केले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा ऐंशीवा वाढदिवस व सहस्रचंद्रदर्शन सोहळा असा समारंभ बुधवारी पोलिस ग्राऊंडवर लोकोत्सव म्हणून जनसागराच्या साक्षीने साजरा झाला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जेथे जेथे संघर्ष तेथे तेथे ‘पुढारी’ पोहोचला. ‘पुढारी’ने लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवले. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात ‘पुढारी’चे योगदान अविस्मरणीय आहे, असे उद्गार अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले. सत्काराला उत्तर देताना डॉ. जाधव यांनी, जनतेचे ऋण ही माझ्या मर्मबंधातील ठेव असल्याचे भावपूर्ण उद्गार काढले. ‘पुढारी’ हा जनतेच्या मनामनातील दीपस्तंभ असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. डॉ. जाधव यांच्यामुळे ‘पुढारी’ महाराष्ट्रात ताठ मानेने उभा असल्याचे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले, तर ‘पुढारी’मुळे आम्ही ‘पुढारी’ झालो, अशा भावना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केल्या.‘पुढारी’चे चेअरमन आणि ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी प्रास्ताविकात या सोहळ्याची भूमिका मांडली आणि साहेब हे पत्रकारितेचे विद्यापीठ असल्याच्या भावना व्यक्त केल्या. या भव्य-दिव्य समारंभाला व्यासपीठावर बहुतांश मंत्री, आमदार, खासदार आदी उपस्थित होते; तर पुणे-मुंबईपासून कोल्हापूरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून ‘पुढारी’वर प्रेम करणार्या जनसागराची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती.
पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव नागरी गौरव समितीच्या वतीने डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते तलवार, सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला, तर सौ. गीतादेवी जाधव यांचा पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलिस परेड मैदानावर बुधवारी अलोट जनसागराच्या साक्षीने हा दिमाखदार सोहळा झाला.
व्यासपीठावर पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव गौरव नागरी सोहळा समितीचे अध्यक्ष, खासदार शाहू महाराज, विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार, गृह राज्यमंत्री योगेश कदम, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आ. राजेश क्षीरसागर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील, राज्य स्वयं-पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, आ. प्रवीण दरेकर, खा. धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, आ. विनय कोरे, आ. राहुल आवाडे, आ. डॉ. अशोकराव माने उपस्थित होते.