

साखरवाडी : फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेवरून काही जणांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मी फलटणला येऊ नये म्हणून काही प्रयत्न झाले होते. मात्र, जर या घटनेत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा जरासा जरी संबंध असता, तर हा कार्यक्रम रद्द करून मी येथे आलोच नसतो. संपूर्ण महाराष्ट्राला देवाभाऊ म्हणजे काय हे माहीत आहे. या पीडित भगिनीला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणावर फलटण तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आ. सचिन पाटील, आ. राहुल कुल, आ. महेश शिंदे, आ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी आमदार राम सातपुते, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, जिजामाला नाईक-निंबाळकर, समशेरसिंह नाईक-निंबाळकर, विक्रमसिंह भोसले, जयकुमार शिंदे, दिलीपसिंह भोसले, जलसंपदा विभागाचे अप्पर सचिव दीपक कपूर, कोल्हापूर परिक्षेत्राचे महापरिनिरीक्षक सुनील फुलारी, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख तुषार दोशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपस्थित होते.
ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, तपास जलदगतीने सुरू आहे. काही दिवसांत या प्रकरणाचे सत्य समोर येईल. या घटनेवरून राजकीय लाभ घेण्याचा जो प्रयत्न केला गेला तो अतिशय निंदनीय आहे. समाजातील संवेदनशीलतेचा विचार न करता राजकारण करणे हे लाजिरवाणे असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी मिश्कील शैलीत रणजितसिंह यांच्या सततच्या मागण्यांवर रणजितदादा यांच्या मागण्या म्हणजे मारुतीच्या शेपटीप्रमाणे कधी संपतच नाहीत. पण लोकप्रतिनिधींचं कामच असतं समाजातील शेवटच्या घटकासाठी मागणी करणं. जोपर्यंत लोकांच्या गरजा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मागण्या चालूच राहतील. पाडेगाव-शिंगणापूर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू. तसेच बाणगंगा नदीचा समावेश ‘अमृत’ योजनेत करण्याचा प्रस्ताव लवकरच मंजूर होईल, असेही त्यांनी सांगितले. फलटण न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करण्यात येणार असून माळशिरस तालुक्यातील बावीस गावांना पाणीपुरवठा योजनेचा लाभ मिळणार आहे. फलटण विमानतळाचा विकास, साखरवाडीतील तहसील व पोलीस निरीक्षक कार्यालयाची स्थापना तसेच नाईकबोमवाडी एमआयडीसीमध्ये नवीन औद्योगिक प्रकल्प लवकरच मंजूर करण्यात येणार आहेत. तसेच फलटण शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवण्याचे कामही लवकरच हाती घेणार असल्याचे ना. फडणवीस यांनी सांगितले.
महायुतीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार व आम्ही सुरू केलेली एकही योजना बंद होऊ देणार नाही. काहीजण म्हणतात की, आता लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे. मात्र, लाडकी बहीण योजना असो वा शेतकऱ्यांची वीज बिल माफी, या सर्व योजना सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
फलटणमधील डॉक्टर भगिनीने आत्महत्या केली. त्याचे कारण तिने हातावर लिहून ठेवले. तरी पण माझ्या बाबतीत राजकारण सुरू केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणमध्ये येऊ नयेत म्हणून अनेक प्रकारे राजकारण झाले. मलाही दोन मुली आहेत; पण अशा प्रकारच्या घाणेरड्या प्रकरणात नाव जोडलं जाते तेव्हा मनाला वेदना होतात. कितीही शिंतोडे टाकू द्या जोपर्यंत मन साफ आहे, आत्मा साफ आहे, तोपर्यंत कोणाला घाबरणार नाही, असे म्हणत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना अश्रू अनावर झाले.