मुंबई : सरकारी नोकरी लावतो सांगून महामुंबईसह, पुणे व आकोल्यातील बेरोजगारांना 2 कोटी 88 लाखांना गंडा घालून फसार झालेल्या सीआयएसएफचे बडतर्फ अंमलदार निलेश काशिराम राठोड याला आर्थिक गुन्हे शाखेने दिल्लीतून अटक केली आहे. तो सराईत असून उकळलले कोट्यवधी रुपयेे चैनीसह दोन मराठी चित्रपटाच्या निर्मितीत गुंतवल्याचे तपासात उघड झाले आहे.
तक्रारदार बीडचा रहिवाशी असून सध्या नवी मुंबईत राहतात. आरोपीने केंद्र किंवा राज्य सरकारी नोकरीचे आमिष दाखवत पाच लाख रुपये घेतले होते. अशाच प्रकारे त्याने इतर काही तरुणांकडून प्रत्येकी पाच ते पंधरा लाख रुपये घेतले होते. सुमारे 2 कोटी 88 लाख रुपये घेतल्यानंतर उमेदवारांना त्याने बोगस मेडीकल टेस्ट सर्टिफिकेट आणि ॲपाईटमेंट लेटर देऊन पलायन केले होते.
त्याच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू असताना तो दिल्लीत पत्नीसोबत वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पथकाने निलेशला दिल्लीतील द्वारका मोड परिसरातून अटक केली. फसवणुकीची रक्कम त्याने चैनीखातर आणि दोन मराठी सिनेमा बनविण्यासाठी खर्च केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
2022 पासून करीत होता फसवणूक
प्राथमिक तपासात आरोपी हा सीआयएसएफचा बडतर्फ अंमलदार असून तो मूळचा अकोला, बार्शीच्या बोरमलीचा रहिवाशी आहे. 2022 पासून त्याने अनेकांना सरकारी नोकरीचे गाजर दाखविले होते. त्यांच्याकडून नोकरीसाठी पैसे घेतले होते. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा, आझाद मैदान, पुण्यातील डेक्कन, अकोला, नवी मुंबईच्या वाशी पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या सर्व गुन्ह्यांत तो पाहिजे आरोपी होता. त्याने मुंबईतील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत साठहून अधिक तरुणांची सुमारे दहा कोटीची फसवणुक केली आहे. इतर पोलीस ठाण्यातील आकडा त्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.
गुन्हे शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन
फसवणुकीच्या या गुन्ह्यांत आरोपीला पहिल्यांदाच अटक झाली असून त्याचा ताबा लवकरच नवी मुंबईसह पुणे आणि अकोला पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे. फसवणूक झालेल्या तरुणांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.