कोपरखैरणे : भूखंडाची मोजणी केल्यानंतर मोजणीचा अहवाल देण्यासाठी सहा लाख रुपये स्वीकारणारा सिडकोचा भूमिलेख उपअधीक्षक दिलीप बागुले याच्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
आरोपींनी तक्रारदारांकडे नऊ लाखांची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे सिडकोच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. नैना क्षेत्रात असलेल्या एका भूखंडाची मोजणी करण्यासाठी तक्रारदारांनी सिडको कडे अर्ज केला होता. त्यानुसार सदर भूखंडाची मागणी करण्यात आली.
त्यानंतर उपअधीक्षक दिलीप बागुले आणि त्याचा सहकारी कलीमुद्दीन शेख यांनी मोजणीचा अहवाल देण्यास दिरंगाई केली. या अहवालासाठी त्यांनी तक्रारदारांकडे नऊ लाख रुपयांची मागणी केली. चर्चेअंती हा सौदा सहा लाख रुपयांवर पक्का झाला.
याप्रकरणी भूखंड मालकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिडकोच्या नैना कार्यालयात सापळा रचला. कलीमुद्दीन शेख याला सहा लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही लाच त्याने बागुले याच्यासाठी घेतल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याही मुसक्या आवळल्या.