Bronchoscopy treatment pudhari photo
मुंबई

Bronchoscopy treatment : तीन महिन्यांपासून तरुणाच्या फुप्फुसात अडकलेली ‘चिकूची बी’ काढण्यात यश

श्वासनलिकेत परकीय वस्तू अडकून राहिल्यामुळे रुग्णाला श्वसनाचा त्रास आणि घरघर जाणवत होती.

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : सतत श्वास घेण्यास त्रास, घरघर आणि उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्रस्त झालेल्या ३८ वर्षीय व्यक्तीच्या आजारामागचे कारण डॉक्टरांनाही सुरुवातीला कळले नाही. मात्र, सखोल तपासणीत त्याच्या डाव्या मुख्य श्वासनलिकेत तब्बल दोन ते तीन महिन्यांपासून चिकूची बी अडकून राहिल्याचे उघड झाले. नवी मुंबईतील खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल येथील फुप्फुसरोग तज्ज्ञांनी ब्रॉन्कोस्कोपीद्वारे ही बी यशस्वीरीत्या काढून रुग्णाला नवजीवन दिले.

उलवे येथील ३८ वर्षीय प्रसाद नाखवा यांना गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच छातीत घरघर जाणवत होती. सुरुवातीला त्यांनी अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतले. औषधांमुळे काही काळ आराम मिळत असला तरी कायमस्वरूपी फरक आढळला नाही. त्यानंतर एका डॉक्टरांनी त्यांना ब्रॉन्कोस्कोपी करण्याचा सल्ला दिला आणि पुढील तपासणीसाठी रुग्णाने मेडिकव्हर हॉस्पिटलकडे धाव घेतली.

याबाबत माहिती देताना मेडिकव्हर हॉस्पिटल, खारघर येथील फुप्फुससरोग तज्ज्ञ डॉ. शाहिद पटेल म्हणाले, ब्रॉन्कोस्कोपीदरम्यान रुग्णाच्या डाव्या मुख्य श्वासनलिकेत चिकूची बी अडकलेली आढळली. त्यामुळे श्वासनलिका जवळपास पूर्णपणे बंद झाली होती. त्याचबरोबर त्या भागात सूज आणि स्रावही साचला होता. जाळीसारख्या विशेष वैद्यकीय उपकरणाच्या (मेश स्नेअर) साहाय्याने भूल देऊन ही बी काळजीपूर्वक काढण्यात आली.

त्यानंतर लगेचच श्वासनलिका खुली झाली आणि रुग्णाला मोकळा श्वास घेता आला. ब्रॉन्कोस्कोपीनंतर अवघ्या दोन तासांत रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे आणि रुग्णाने हळूहळू कामांनाही सुरुवात केली आहे.

चिकुची बी जवळपास तीन महिने श्वासनलिकेत अडकून राहिल्याने ती श्वासनलिकेच्या आतील भिंतीला घट्टपणे चिकटली होती. शिवाय तिचा पृष्ठभाग गुळगुळीत असल्यामुळे उपकरणाने पकड घेणे आव्हानात्मक होते. जवळपास ५० मिनिटे चाललेल्या या प्रक्रियेत अत्यंत संयम आणि अचूकतेने काम करून कोणतीही दुखापत न करता बी यशस्वीरीत्या काढण्यात आली.
डॉ. शाहिद पटेल फुफ्फुसरोग तज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT