Salim Fruitwala Wedding Video pudhari photo
मुंबई

Salim Fruitwala Wedding Video : छोटा शकीलच्या मेहुण्यावर लग्नात नोटांची उधळण

मुलाच्या लग्नात सलीम फ्रूटवालाचा नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल; खंडणी, मालमत्ता बळकावणे आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमुळे पुन्हा चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूटवाला याच्या मुलाच्या लग्नसोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलीम फ्रूटवाला नाचताना दिसत असून, त्याच्यावर उपस्थितांकडून चलनी नोटांची उधळण केली जात आहे. यापूर्वी खंडणी वसुली, मालमत्ता बळकावणे आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणांत तपास यंत्रणांच्या रडारवर आलेल्या सलीमच्या या लग्नसोहळ्याची आता चर्चा सुरू झाली आहे.

सलीम फ्रूटवाला याला सलीम फ्रूट या नावानेही ओळखले जाते. तो छोटा शकीलच्या बहिणीचा पती आहे. दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित कथित कारवाया आणि आर्थिक व्यवहारांच्या तपासादरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ऑगस्ट २०२२ मध्ये त्याला अटक केली होती. त्याच्याविरोधात खंडणी वसुली आणि मालमत्ता बळकावण्यासह आर्थिक अन्य गैरव्यवहारांच्या आरोपांचाही तपास झाला.

दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्या टोळीशी संबंधित आर्थिक व्यवहार, खंडणी वसुली तसेच मालमत्तांवरील कथित बेकायदेशीर ताबा या प्रकरणांचा तपास विविध यंत्रणांकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सलीम फ्रूटवालाच्या कौटुंबिक सोहळ्यातील व्हिडीओ समोर आल्याने त्याच्या आर्थिक व्यवहारांबाबतही सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये लग्नाच्या कार्यक्रमात सलीम फ्रूटवाला उत्साहात नाचताना दिसतो. त्याचवेळी त्याच्यावर नोटा उधळल्या जात असल्याचेही स्पष्टपणे दिसते. लग्नसोहळ्यातील हा जल्लोष आणि नोटांची उधळण यामुळे व्हिडीओला मोठ्या प्रमाणात प्रसार मिळत आहे. मात्र, हा व्हिडीओ नेमका कधी आणि कुठे चित्रित करण्यात आला, तसेच नोटांची उधळण करणाऱ्या व्यक्ती कोण आहेत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

  • एकीकडे अंडरवर्ल्डशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर तपास यंत्रणांचे लक्ष असताना दुसरीकडे अशा व्यक्तींच्या कौटुंबिक सोहळ्यांतील आलिशान दृश्ये चर्चेत येत आहेत. त्यामुळे सलीम फ्रूटवालाच्या व्हायरल व्हिडीओच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबईतील अंडरवर्ल्ड, त्यांचे आर्थिक व्यवहार आणि तपास यंत्रणांच्या कारवाईचा विषय ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT