निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची छठपूजा जोरात pudhari photo
मुंबई

Chhath Puja 2025 : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची छठपूजा जोरात

ठाकरे, मनसेची मूक संमती : महापालिकेकडून अतिरिक्त सुविधांची तयारी, वन विंडो सिस्टिम

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय समाजाला खूश करण्यासाठी छठ पूजेकरिता सर्व सोयी -सुविधा पुरविण्याचे निर्देश पालकमंत्री आशिष शेलार आणि सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून देण्यात आले आहेत. मात्र, मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणाऱ्या दोन्ही शिवसेना आणि राज ठाकरे यांचा मनसे यापैकी कुणीही या छठपूजेच्या सुविधेबद्दल चकार शब्द काढलेला नाही. छठपूजेला विरोध केला तर उत्तर भारतीयांची थोडीफार पडणारी मतेदेखील मिळणार नाहीत, हा अंदाज घेऊनच हे पक्ष शांत राहिले आहेत.

छठपूजेच्या काळात अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी, वाहने आणि साधनसामग्री तैनात करण्यात येणार आहेत. सर्व पूजास्थळांवर निर्माल्य कलश, तात्पुरती प्रसाधनगृहे, तसेच टेबल-खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. धूम्रफवारणी व कचरा व्यवस्थापनावरही विशेष भर देण्यात आला आहे. प्रत्येक विभागात समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत. परवानग्या देण्यासाठी ‌‘वन विंडो सिस्टम‌’ लागू करण्यात आली आहे. सर्व ठिकाणी पिण्याचे पाणी आणि प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

छठपूजा उत्सव सुरक्षिततेने, स्वच्छतेने आणि सुसंवादाने साजरा करावा. समुद्रात खोल पाण्यात जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, आपत्कालीन परिस्थितीत 1916 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

403 वस्त्रांतरगृहे आणि प्रकाशव्यवस्था

भाविकांच्या सोयीसाठी शहरभर 403 वस्त्रांतरगृहे उभारण्यात आली असून सर्व ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून वाहनतळाचीही व्यवस्था करण्यात येत आहे.

अशी असेल सुविधा

  • घाटकोपर : सर्वाधिक 44 तलाव

  • दहिसर : 22 तलाव

  • कांदिवली : 16 तलाव

  • सर्व ठिकाणी पाण्याची उपलब्धता आणि स्वच्छतानिर्माल्य व

  • स्वच्छतेची विशेष काळजी

  • यंदा 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या छठपूजेसाठी शहर आणि उपनगरातील एकूण 68 ठिकाणी 148 कृत्रिम तलाव, तसेच 403 वस्त्रांतरगृहे उभारण्यात आली आहेत. गेल्या वर्षी 50 ठिकाणी छठपूजा झाली होती. त्यावेळी 80 कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. छठपूजा काळात भाविकांच्या सोयीसाठी मेट्रो आणि बेस्ट बस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवण्याचा प्रस्तावही संबंधित विभागांकडे पाठविण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT