

मुंबई : सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व मार्गे अंधेरी पश्चिम येथे जाऊन थांबते. यापुढे गुंदवलीवरून थेट मिरा रोड गाठता येणार आहे. तसेच अंधेरी पश्चिम येथून सुटणारी मेट्रो दहिसरपर्यंतच थांबेल. कारण यापुढे मेट्रो 2 अ म्हणजेच पिवळी मार्गिका आणि मेट्रो 7 म्हणजेच लाल मार्गिका या दोन्ही मार्गिका स्वतंत्रपणे चालवल्या जाणार आहेत.
सध्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या दोन्ही मार्गिकांचे संचालन चारकोप डेपोतून केले जाते. यापुढे चारकोप डेपोतून केवळ मेट्रो 7 मार्गिकेचे संचालन केले जाईल. मेट्रो 2 अ मार्गिकेचे संचालन मंडाळे डेपोतून केले जाईल. मेट्रो 2 ब मार्गिकेचा डायमंड गार्डन ते मंडाळे हा टप्पा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. भविष्यात मेट्रो 2 अ आणि मेट्रो 2 ब या दोन्ही मार्गिका एकत्रित चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण मेट्रो 2 मार्गिकेचे संचालन मंडाळे डेपोतून केले जाईल.
दहिसर पूर्व ते काशिगाव (मिरा रोड) ही मेट्रो 9 मार्गिकाही लवकरच कार्यान्वित होईल. यानंतर मेट्रो 7 आणि मेट्रो 9 मार्गिका एकत्र केल्या जातील. परिणामी, गुंदवलीवरून मेट्रो पकडल्यावर थेट मिरा रोडपर्यंत प्रवास करता येईल.
तसेच मेट्रो 7 मार्गिकेचा विस्तार विमानतळापर्यंत केला जाणार आहे. मेट्रो 7 अ, 7 आणि 9 या तिन्ही मार्गिका एकत्र होतील. मेट्रो मार्गिकांमधील या बदलांमुळे चेंबूर, कुर्ला, वांद्रे कुर्ला संकुल, विमानतळ, काशिगाव ही महत्त्वाची ठिकाणे जोडली जातील.