Chhagan Bhujbal news Pudhari
मुंबई

Shivbhojan Centres: शिवभोजन केंद्रे पुन्हा सुरू करणार; भुजबळ यांची घोषणा

बंद केंद्रांना करणार गॅस पुरवठा; छत्रपती संभाजीनगरातील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी १० कोटी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा केला जाणार असून, काही कारणांमुळे बंद पडलेली ही केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

भाजपच्या उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळ म्हणाले, शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील ४२ पैकी ४१ शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत आहेत.

ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या, ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे, तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयासाठी महानगरपालिकेला १० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. अजित पवार राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून सुमारे ९०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळाची नेमणूक तसेच अन्य आवश्यक कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील, असे सामंत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT