Chembur Accident Pudhari
मुंबई

Chembur Accident: रक्षाबंधनची भेटवस्तू घेण्यासाठी जाणाऱ्या बहिणीचा अपघातात मृत्यू; टँकरचालकास अटक, भाऊ गंभीर जखमी

या अपघातात भाऊही गंभीर जखमी झाला असून चेंबूर पोलिसांनी यामध्ये गुन्हा दाखल करत टँकरचालकाला अटक केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

कुर्ला: भावाकडून रक्षाबंधनची भेटवस्तू घेण्यासाठी दुचाकीवरून जात असताना बहिणीचा सिमेंट मिक्सर टँकरखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी चेंबूर परिसरात घडली आहे. या अपघातात भाऊही गंभीर जखमी झाला असून चेंबूर पोलिसांनी यामध्ये गुन्हा दाखल करत टँकरचालकाला अटक केली आहे.

धनश्री डोंगरे (२५) असे यातील मयत तरुणीचे नाव असून ती गोवंडीच्या गौतम नगर परिसरातील निबोणी बाग परिसरात आई-वडील आणि लहान भावासोबत राहत होती. शुक्रवारी सकाळी रक्षाबंधन झाल्यानंतर ती भावांकडून भेटवस्तू घेण्यासाठी चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या बाजारात गेली होती.

लहान भाऊ मानस डोंगरे यांच्यासोबत ती दुचाकीवरून चेंबूरच्या दिशेने निघाली होती. मात्र सुभाष नगर परिसरात आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला एका सिमेंट मिक्सर टँकरने मागून धडक दिली. अपघातानंतर मानस रस्त्याच्या डाव्या बाजूला पडला. तर धनश्री ही टँकरच्या पुढच्या चाकाखाली जाऊन गंभीर जखमी झाली होती.

स्थानिकांनी तत्काळ टँकरला बाजूला घेऊन या तरुणीला टँकरखालून बाहेर काढले. याच दरम्यान घटनास्थळी चेंबूर पोलीस दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ दोघांना चेंबूरमधील झेन रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता, तर तिच्या भाऊदेखील जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

धनश्री ही उच्चशिक्षित होती. सध्या ती एका खासगी कंपनीत काम करून कुटुंबाला आर्थिक मदत करत होती. मात्र तिचा असा अचानक मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, तर ती राहत असलेल्या निबोणी बाग परिसरात देखील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT