Chandrashekhar Bawankule on Pravin Gaikwad
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी, त्यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हेच दीपक काटेचे गॉडफादर असल्याचा दावा त्यांनी केला. बावनकुळे भाजप प्रदेशाध्यक्ष असताना दीपक कुटे त्यांच्यासोबत सतत दिसला असल्याच्या व्हिडिओ क्लीपही त्यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषेदत दाखवल्या. यावर आता मंत्री बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला तो निषेधार्ह असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'दीपक काटे यांच्या पक्ष प्रवेशला मी गेलो होतो. ते चांगले काम करतील असे बोललो होतो. विचाराची लढाई असू शकते, पण त्याने हल्ला करणे याला आपली संस्कृती साथ देत नाही. महाराष्ट्राच्या कोणत्याही आमदाराचे याला समर्थन नाही. पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.'' असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
दीपक काटे मला दोन तीन वेळा भेटले होते. समाजात तेढ निर्माण करण्याचे राजकारण आमचे नाही. आम्ही संस्कार, संस्कृतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा मी पहिल्यांदा निषेध केला. दीपक काटे यांचा पक्ष प्रवेश अडीच वर्षापूर्वी केला होता. तेव्हा मी त्यांच्याबद्दल बोललो होतो. त्यावेळी पक्षात प्रवेश करण्यापूर्वी मी बोललो होतो की चांगले काम करेल. त्यांनी कार्यक्रमात मला पुष्पगुच्छ दिला होता. काटे यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई झाली पाहिजे. अशा हल्ल्याचे समर्थन नाही. त्यांनी केलेले कृत्य चुकीचे आहे, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.
काटे यानेच माझ्यावर हल्ला केल्याचे सांगत गायकवाड यांनी, गुन्हेगाराला मुक्त सोडून माझ्या हत्येसाठी पाठवल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर बावनकुळे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.