मुंबई : मध्य रेल्वेची लोकल वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे मंगळवारी सकाळी विस्कळीत झाली. बदलापूर-मुंबई मार्गावर बिघाड झाल्याने लाखो चाकरमान्यांचे हाल झाले. लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावल्याने प्रवाशांचा कामावर लेटमार्क लागला.
सकाळच्या सुमारास बदलापूर स्थानकाच्या आसपास तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक कोलमडली.तांत्रिक अडचणीमुळे अप मार्गावरील मुंबईकडे जाणाऱ्या लोकल वाहतुकीचे तीनतेरा वाजले. सकाळी 7 ते 9 या गर्दीच्या वेळेतच हा बिघाड झाल्याने प्रवाशांना याचा मोठा फटका बसला.यामुळे बदलापूरहून मुंबई, ठाणे, कल्याणकडे जाणाऱ्या अनेक गाड्या जागच्या जागी थांबल्या. काही गाड्या या अतिशय धीम्या गतीने धावल्या.
वाहतूक विस्कळीत झाल्याने बदलापूर, कल्याण, डोंबिवली, ठाणे यांसह विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी झुंबड उडाली. मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने विविध स्थानकात चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. रोजच्या वेळेनुसार स्टेशनवर आलेल्या प्रवाशांना लोकल वेळेवर मिळत नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कामावर वेळेवर पोहोचण्याची चिंता आणि लोकलच्या वारंवार होणाऱ्या विलंबाचा संताप प्रवाशांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला.
रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी
मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलवर अवलंबून नोकरदारांना या विस्कळीत सेवेचा मोठा फटका बसला. 30 मिनिटांहून अधिक विलंबाने लोकल सुरू झाल्याने अनेकांना ऑफिसला पोहोचायला उशीर झाला. ही समस्या रोजचीच असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला गेला. लोकल उशिरा सुरू असल्याने अनेक प्रवाशांचे वेळापत्रकच नाही, तर संपूर्ण दिवसाचेच नियोजन कोलमडले.दरम्यान, हा बिघाड लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने तातडीने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले. प्रवाशांची गैरसोय झाल्याने रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली.