मुंबई : मध्य रेल्वेने 2 डिसेंबरपर्यंत विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्याची घोषणा केली आहे. या ब्लॉकदरम्यान पनवेल ते कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स बांधकामात येणारे यांत्रिक अडथळे दूर केले जाणार आहेत. यामुळे काही रेल्वे व लोकल गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होणार आहे.
मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याणदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10. 40 ते दुपारी 3.40 दरम्यान मेगा ब्लॉक असेल. यावेळी ठाणे ते कल्याण धावणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही फेऱ्या रद्द राहतील. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान ब्लॉक नसेल. तर बेलापूर ते पनवेलदरम्यान ब्लॉक असणार आहे. याशिवाय मरेवर 22 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत गर्डर उभारण्यासाठी बदलापूर स्टेशन येथे मध्यरात्रीनंतर 2 ते 3. 30 पर्यंत ब्लॉक राहील. बदलापूर स्थानक परिसरात पादचारी पुलाचे गर्डर उभारणीचे काम शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झाले आहे. पादचारी पुलासाठी 37. 2 मीटर लांबीचे 18 स्टील गर्डर उभारण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर 30 दिवसांचा ब्लॉक
पुढील वर्षी जानेवारी अखेरपर्यंत बोरिवलीपर्यंतच्या प्रस्तावित सहाव्या लाईनच्या कामासाठी 20 डिसेंबरपासून पुढे 30 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात काही लोकल गाड्या उशिराने धावतील किंवा काही रद्द होतील. बोरिवली स्टेशनवर काही गाड्यांचा थांबा देखील रद्द केला जाईल. पाचवी लाईन प्रवासी गाड्यांसाठी बंद राहील. इतर मार्गांवर गाड्यांचा वेग कमी केला जाईल. पाचव्या लाईनवरून धावणाऱ्या सर्व गाड्या, मेल आणि लोकल अंधेरी-गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान फास्ट लाईनवर चालवल्या जातील. या 30 दिवसांच्या ब्लॉक काळात, 20 डिसेंबरच्या रात्रीपासून ते 18 जानेवारी 2026 पर्यंत काम चालेल.
या काळात 8 अप आणि 10 डाऊन गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येईल. तसंच 112 अप आणि 9 डाऊन गाड्यांना उशिराने धावण्याची शक्यता आहे. या काळात पाचवी लाइनदेखील बंद राहील. 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर या पाच दिवस रात्री 11 वाजल्यापासून ते पहाटे 4. 30 वाजेपर्यंत काम चालेल.