Crime News pudhari photo
मुंबई

Housing project fraud : बिल्डर-बँक अधिकाऱ्यांचे संगनमत; सीबीआयचे छापे

बंगळुरू, मुंबई आणि पुण्यात १२ ठिकाणी झडती; पाच नवे गुन्हे दाखल, आतापर्यंत ५५ प्रकरणे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गृहप्रकल्पांमध्ये बिल्डर आणि वित्तीय संस्थांच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून घरखरेदीदारांची फसवणूक केल्याच्या प्रकरणांत केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठी कारवाई केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने पाच नवे गुन्हे दाखल केले असून, या प्रकरणांच्या तपासासाठी गुरुवारी बंगळुरू, मुंबई आणि पुण्यातील १२ ठिकाणी एकाचवेळी झडती घेण्यात आली.

या पाच प्रकरणांपैकी चार गुन्हे ओझोन समूह आणि त्याच्याशी संबंधित संस्थांविरुद्ध असून, त्यांचा बंगळुरू आणि मुंबईतील गृहप्रकल्पांशी संबंध आहे. तर एक गुन्हा बंगळुरूतील मे. विवान्सा बाल्सम या बांधकाम कंपनीविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये विविध वित्तीय संस्थांच्या अज्ञात अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

बिल्डर आणि वित्तीय संस्थांच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून निष्पाप घरखरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणांमध्ये कटकारस्थान, फसवणूक, विश्वासघात तसेच वित्तीय संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून कथित गैरप्रकार यासंदर्भातील कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गृहप्रकल्पांतील कथित आर्थिक गैरव्यवहार, निधी वळविणे आणि घरखरेदीदारांची फसवणूक यामागील मोठे कटकारस्थान उघड करण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात येत असल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर ५५ प्रकरणे

गृहखरेदीदारांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कथित फसवणुकीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने देशभरातील विविध बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध यापूर्वी ५० गुन्हे दाखल केले होते. गुरुवारी दाखल झालेल्या पाच नव्या गुन्ह्यांमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणांची संख्या ५५ झाली आहे.

  • १२ ठिकाणी झालेल्या झडतीदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि अन्य संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. या साहित्याची तपासणी सुरू असून, निधीचा कथित गैरवापर, आर्थिक अनियमितता आणि बिल्डर-वित्तीय संस्थांच्या अधिकाऱ्यांमधील संबंधांचा तपास केला जात आहे.

  • ओझोन समूहाविरुद्ध चार गुन्हे

  • बंगळुरू आणि मुंबईतील गृहप्रकल्पांचा समावेश

  • विवान्सा बाल्समविरुद्ध एक गुन्हा

  • वित्तीय संस्थांच्या अज्ञात अधिकाऱ्यांचाही तपास

  • बंगळुरू, मुंबई, पुण्यात १२ ठिकाणी झडती

  • कागदपत्रे व डिजिटल उपकरणे जप्त

  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आतापर्यंत ५५ प्रकरणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT