

मुंबई : परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पायधुनी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी हरियाणा, बिहार आणि मुंबईतून तीन आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींकडून ५० भारतीय पासपोर्ट, सहा संगणक/लॅपटॉप, नऊ मोबाइल हँडसेट तसेच १३ बँक चेकबुक, डेबिट कार्ड, आधार, पॅन आणि मतदान ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत दहा जणांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, फसवणूक झालेल्यांची संख्या ५० पेक्षा अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मशीद बंदर पश्चिम येथील ‘अल शिफा ट्रॅव्हल्स’ या कार्यालयातून ही टोळी परदेशात नोकरी लावण्याच्या नावाखाली नागरिकांना गंडा घालत होती. आरोपी इच्छुक उमेदवारांना परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत. त्यानंतर त्यांच्याकडून मूळ पासपोर्ट, बायोडाटा आणि इतर कागदपत्रे घेतली जात होती. तसेच प्रत्येकाकडून १५ हजार रुपये घेतले जात होते. मात्र, पैसे आणि कागदपत्रे घेतल्यानंतर आरोपी नोकरी देत नसत. त्यानंतर कार्यालय बंद करून तसेच वापरातील मोबाइल बंद करून आरोपी पसार झाले होते.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानंतर तबरेज आलम अन्सारी याला हरियाणा, मोहम्मद शमीम अन्सारी याला मधुबनी, बिहार येथून, तर व्यंकटेश गंगय्या चकल याला मुंबईतील जे. जे. धर्मशाळा, टँकर स्ट्रीट परिसरातून अटक करण्यात आली.
कंटाळलेल्या नागरिकांनी पायधुनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या. त्यानुसार पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८८६/२०२६ नोंदवण्यात आला. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३४०(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस आयुक्त देवेन भारती, पोलिस सहआयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त रागसुधा आर. तसेच सहायक पोलिस आयुक्त रेणुका बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजय कदम व त्यांच्या पथकाने तपास करून आरोपींना अटक केली.
५० पासपोर्टमुळे तपासाला वेग
आरोपींच्या ताब्यातून तब्बल ५० भारतीय पासपोर्ट सापडल्याने या टोळीने मोठ्या प्रमाणावर नागरिकांना लक्ष्य केले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी सहा लॅपटॉप आणि नऊ मोबाइलही जप्त केले आहेत. याशिवाय बनावट नियुक्तीपत्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत. त्यामुळे आरोपींकडून आणखी किती नागरिकांची फसवणूक झाली, तसेच त्यांचे पैसे आणि कागदपत्रे नेमकी कुठे वापरली गेली, याचा तपास सुरू आहे.
फसवणूक झाल्यास पोलिसांशी संपर्काचे आवाहन
या प्रकरणात आतापर्यंत १० व्यक्तींची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे पीडितांची संख्या ५० पेक्षा अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अशा प्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांनी तातडीने पायधुनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.