मुंबई : कर्करोगावरील स्वदेशी संशोधनाची माहिती देताना टाटा मेमोरियलचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता आणि डॉ. राजेंद्र बडवे. pudhari photo
मुंबई

Breast Cancer Research : कार्बोप्लाटिन औषधामुळे कर्करोगावर प्रभावी नियंत्रण!

स्वदेशी संशोधनात डॉक्टरांची यशस्वी कामगिरी, स्तन कर्करोगग्रस्त महिलांचे आयुष्य वाढणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भारतीय विज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. मुंबईतील परळ येथील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये झालेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे की, ‌‘कार्बोप्लाटिन‌’ या स्वस्त आणि प्रभावी औषधामुळे ट्रिपल-नेगेटिव्ह स्तनाचा कर्करोग नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.

या औषधाच्या वापरामुळे स्तन कर्करोगग्रस्त महिलांच्या जगण्याची शक्यता तब्बल 11 टक्क्यांनी, तर कर्करोग मुक्त राहण्याचे प्रमाण 12 टक्क्यांनी वाढले आहे. म्हणजेच, प्रत्येक 100 महिलांपैकी सात महिलांचे आयुष्य या औषधामुळे वाचले आहे. हा अभ्यास ‌‘जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी‌’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये 20 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला असून, त्याला ‌‘प्रॅक्टिस-डिफायनिंग स्टडी‌’ म्हणून मान्यता मिळाली आहे.

तज्ज्ञांच्या मते, या निष्कर्षानंतर जगभरातील कर्करोग उपचार मार्गदर्शक तत्वे नव्याने निश्चित केली जात आहेत. ट्रिपल-निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरसाठी आता कार्बोप्लाटिन मानक उपचारपद्धतीचा भाग ठरला आहे.

टाटा मेमोरियलचे संचालक आणि या अभ्यासाचे प्रमुख संशोधक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले, “केमोथेरपीमध्ये कार्बोप्लाटिनसारखी स्वस्त औषधे समाविष्ट केल्यास ट्रिपल-नेगेटिव्ह स्तन कर्करोगग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढवता येते. हा निष्कर्ष वैद्यकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे.

दहा वर्षांच्या अभ्यासातून सिद्ध झाले यश

2010 ते 2020 दरम्यान झालेल्या या अभ्यासात 720 भारतीय महिलांचा समावेश होता. महत्त्वाचे म्हणजे, या औषधामुळे कोणतेही गंभीर दुष्परिणाम आढळले नाहीत. संशोधनात असे आढळले की, पारंपरिक केमोथेरपीसोबत कार्बोप्लाटिन दिल्यास पाच वर्षांच्या जगण्याचे प्रमाण 67% वरून 74% झाले, कर्करोगमुक्त होण्याचे प्रमाण 64% वरून 71% पर्यंत वाढले. 50 वर्षांखालील महिलांमध्ये तर हा परिणाम अधिक प्रभावी ठरला, त्यांच्यात जगण्याचे प्रमाण 66% वरून 77% पर्यंत वाढले.

महिलांसाठी आशेचा नवा किरण

रुग्ण अधिकार कार्यकर्त्या देविका भोजवानी म्हणाल्या, हा अभ्यास फक्त भारतासाठीच नव्हे, तर जगभरातील स्तन कर्करोगग्रस्त महिलांसाठी ‌‘गेम चेंजर‌’ ठरणार आहे. किफायतशीर औषधांमुळे लाखो महिलांना नवजीवन मिळू शकते. भारतामध्ये सुमारे 30 टक्के स्तन कर्करोग रुग्ण ट्रिपल-निगेटिव्ह श्रेणीत येतात. त्यामुळे ही शोधमोहीम देशाच्या जनस्वास्थ्य आणि कॅन्सर उपचार व्यवस्थेतील एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.

“भारताच्या एका केंद्रातून इतका उच्च दर्जाचा आणि निर्णायक अभ्यास पुढे आल्याने जागतिक संशोधनात भारताचे योगदान अधोरेखित झाले आहे. ‌‘कार्बोप्लाटिन‌’ या औषधाच्या माध्यमातून भारताने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ज्ञान, विज्ञान आणि संवेदना यांच्या संगमातूनही जीव वाचवता येतात.
डॉ. बडवे, टीएमसीचे माजी संचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT