मुंबई : वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) कपात नवरात्रीपासून (22 सप्टेंबर) लागू झाली. त्यानंतर दिवाळीपर्यंत कारची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. या कालावधीत सरासरी दर दोन सेकंदांना एक कार विकली गेली. यामध्ये विक्री झालेल्या 78 टक्के कार दहा लाख रुपयांच्या आतील आहेत.
कर्ज व्याजदरात झालेली घट, पाठोपाठ जीएसटी दरात कपात झाल्याने कारची मागणी वाढली आहे. एसबीआय रिसर्चच्या अहवालानुसार सप्टेंबर ते ऑक्टोबर-2025 या कालावधीत 10 लाख रुपयांच्या आतील कारची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यातही पाच ते दहा लाख रुपयांच्या कारच्या मागणीचा वाटा 64 टक्के असून, पाच लाख रुपयांखालील कारचा वाटा 14 टक्के आहे. उत्सव काळातील विक्रीत याच श्रेणीतील कारचे प्राबल्य होते. नवरात्री ते दिवाळी या कालावधीत दर दोन सेकंदाला एक कार विकल्या गेली. त्यामुळे वाहनांचे वितरण करताना डिलरची दमछाक झाली.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमाबाइल मॅन्युफॅक्चरर्सने (एसआयएएम) दिलेल्या माहिती नुसार सप्टेंबर महिन्यात चार मीटर लांबीच्या कार आणि एसयूव्हीची मिळून 1 लाख 70 हजारांची विक्री झाली. ऑक्टोबर महिन्यात हे प्रमाण 2 लाख 20 हजारांवर गेले. सप्टेंबर-2024 मध्ये 1 लाख 80 हजार आणि ऑक्टोबरमध्ये 1 लाख 90 हजार कारची विक्री झाली होती. मारुती सुझुकीने या कालावधीत 5 लाख कारची मागणी नोंदविली असून, 4.1 लाख कारची अवघ्या 40 दिवसांत विक्री केली आहे.
एप्रिल ते ऑक्टोबरमधील जीएसटी कपातीपूर्वीचा कालावधी पाहिल्यास त्यात विक्री 16.7 टक्क्यांनी वाढली होती. जीएसटी कपात लागू झाल्यानंतर हा टक्का 20.5 वर झेपावला. म्हणजेच जीएसटी 28 वरून 18 टक्क्यांवर आल्यानंतर मागणीत 50 टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदविण्यात आली.
लहान कारचा खप 35 टक्क्यांनी वाढला...
लहान कारचा खप 35 टक्क्यांनी वाढला आहे. त्यात ग््राामीण भागाचा वाटा अधिक आहे. तर, महानगरात 15 ते 20 लाख श्रेणीतील वाहनांचा खप 26 टक्क्यांनी वाढला असून, 20 लाखांवरील वाहनांचा खप 40 टक्क्यांनी वाढला आहे. शहरी भागात प्रीमियम वाहनांना अधिक मागणी असल्याचे दिसून येते.