मुंबई : विवेक कांबळे
1925 साली वरळीच्या लॅमिंग्टन रोडवर एका छोट्याशा जागेत केवळ 5 अंध मुलांना घेऊन सुरू झालेल्या ‘द हॅपी होम स्कूल फॉर द ब्लाईंड’ या शाळेने नाबाद शतक पूर्ण केले असून अंध मुलांना मुख्य प्रवाहातील अभ्यासक्रमासोबतच संगीत कक्ष, वाचनालय, संगणक विभाग, व्यायामशाळा अशा विशेष सुविधा उपलब्ध करून देत त्यांना संगीत, सुतारकाम, कुंभारकाम, शिवणकामाचेही धडे या शाळेत दिले जातात.
1985 साली या शाळेत एक अंध विद्यार्थी म्हणून दाखल झालेले हिरेन दवे आज याच शाळेत संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या संगीत प्रेमाला शाळेने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे दवे सांगतात. ते म्हणाले, “माझ्यातील प्रतिभा ओळखण्यास आणि तिला अधिक समृद्ध करण्यास शाळेतील शिक्षकांनी मला प्रोत्साहन दिले. 2003 साली मी 10वीपर्यंतचे शिक्षण घेऊन या शाळेतून बाहेर पडलो, त्यानंतर मी संगीतात उच्चशिक्षण घेतले”. संगीत विशारद असलेले दवे, भारतीय शास्त्रीय संगीतात पदवी समकक्ष शिक्षण घेऊन 2010 साली पुन्हा याच हॅपी होम अंध मुलांच्या शाळेत संगीत शिक्षक म्हणून रुजू झाले. दवे विवाहित असून त्यांच्या दोन मुलांसह मुंबईतील सॅन्डहर्स्ट रोड परिसरात राहतात.
हॅपी होम अंध मुलांच्या शाळेतील अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी दवे हे एक उदाहरण आहे. केवळ मुलांसाठी सुरू केलेल्या या निवासी शाळेत आता मुलींनाही प्रवेश दिला जातो. या गजबजलेल्या जगात अंध मुलांना त्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवता यावे हेच आमचे ध्येय असल्याचे, शाळेचे संचालक पद्मश्री मेहेर बानाजी सांगतात. खरं तर अंध मुलांना शिक्षण देण्याची संकल्पना आजपासून तब्बल 100 वर्षांपूर्वी जन्माला आली. त्यावेळी अंध मुले केवळ शिवणकाम, टोपली बनवणे आदी कामे करू शकतील, असा समज होता.
शाळेचे संस्थापक कूमी सोहराब भरुचा यांच्यासाठी हे एक मोठे आव्हानच होते. त्यावेळी ही शाळा बीडीडी चाळीच्या सर्वांत वरच्या मजल्यावर भरायची. दिवसा शाळेचे वर्ग भरणाऱ्या खोल्याच रात्री वसतिगृहात रूपांतरित व्हायच्या. 1971 साली शाळा आजच्या पत्त्यावर म्हणजे वरळीतील ॲनी बेझन्ट रोडवर स्थलांतरित झाली. इथे पाऊल टाकल्यानंतर अंध मुलांना पहिल्यांदा जाणीव झाली की,त्यांना जे ऐकू येते, जे जाणवते, ज्याला ते स्पर्शही करू शकतात, पण पाहू शकत नाहीत, त्याच्याशी त्यांचे जग जोडलेले आहे.
वरळीतील या शाळेच्या 3 मजली इमारतीत मुख्य प्रवाहातील शिक्षणाच्या वर्गखोल्यांव्यतिरिक्त खास अंध मुलांसाठी बनवलेले वाचनालय, संगणक कक्ष आणि संगीत खोली अशा सुविधाही आहेत. एवढेच नव्हे, तर येथे सुतारकाम, कुंभारकाम व मशीनवरील शिवणकामाच्या कार्यशाळादेखील आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्यांना भविष्यात उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडतील अशा विविध गोष्टींच्या प्रशिक्षणासह त्यांच्यासाठी येथे एक सुसज्ज व्यायामशाळासुद्धा सुरू करण्यात आली आहे.
बानाजी म्हणाले, “नियमित शाळांमध्ये अंध मुलांना एकटे पडल्यासारखे वाटते, कारण इतर उपक्रमांत त्यांचा सहभाग मर्यादित असतो. उदा. नियमित शाळांमध्ये व्यायामशाळेच्या तासाला अंध मुलांना एका बाजूला बसवले जाते. याउलट इथे आमचे विद्यार्थी एकत्रितपणे व्यायामाचे प्रकार उत्तमरित्या करतात. इथे दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना फी भरणे अनिवार्य नाही. दानशूर व्यक्तींकडून मिळणाऱ्या देणग्यांसोबतच विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंची प्रदर्शने भरवून शाळा पैसे कमावते.
अशा विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेत शाळेतील विद्यार्थी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या 10 वीच्या परीक्षेलाही बसतात. त्यात उत्तीर्ण झाल्यावर अनेक विद्यार्थी आपल्या मार्गांनी निघून जातात, तर दवेंसारखे काही विद्यार्थी पुन्हा शाळेसोबत जोडले जातात. कारण ही वास्तू त्यांना आपले घर वाटते.