

मुंबई : राज्यातील सर्व शाळांमध्ये आता विद्यार्थी आणि शिक्षकांची हजेरी विद्या समीक्षा केंद्र (व्हीएसके) प्रणालीवरच नोंदवावी लागणार आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने शाळांना विस्तृत मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत. डिजिटल पद्धतीने उपस्थिती नोंदवण्याचा हा निर्णय यंदापासूनच लागू केला आहे.
केंद्र शासनाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून व्हीएसके प्रणाली राज्यभर लागू करण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीवर थेट नियंत्रण ठेवणे, वास्तविक उपस्थितीचे विश्लेषण करणे आणि शाळा पातळीवरील प्रशासकीय पारदर्शकता वाढवणे या उद्दिष्टांसाठी ही प्रणाली सक्षम ठरणार असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. आता राज्यातील सर्व शाळांनी ऑफलाईन पद्धतीला पूर्णविराम देत ऑनलाईन हजेरी प्रणाली स्वीकारण्याची तयारी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
संचालनलायाने एक परिपत्रक काढत नव्या सूचनांनुसार, प्रत्येक शाळेने व्हीएसके प्रणालीचा दैनंदिन वापर करून विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांची उपस्थिती नोंदवणे बंधनकारक आहे. उपस्थिती नोंदीत कोणतीही तांत्रिक त्रुटी किंवा विलंब होऊ नये यासाठी शिक्षकांनी गुगल प्ले स्टोअरवरील मडुळषींउहरींफ हे अधिकृत ॲप डाउनलोड करून त्यावर शाळेचा यू-डायस क्रमांक व प्राथमिक माहिती नोंदवावी.
ॲपमध्ये शाळेची माहिती प्रदर्शित झाल्यानंतर ती अचूक असल्याची खातरजमा करून पुढील टप्पा पूर्ण करायचा आहे. त्यानंतर संबंधित वर्ग शिक्षकांनी स्वतःचा शालार्थ आयडी प्रविष्ट करून शालार्थातील माहिती योग्य असल्याची पडताळणी करणे आवश्यक असल्याचेही या परिपत्रकात म्हटले आहे.
शाळांमधील हजेरी नोंदीची अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी केंद्रप्रमुखांनी दररोज आढावा घेणे बंधनकारक असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. शाळांनी उपस्थिती नोंदणीसंदर्भातील कार्यपद्धतीसाठी शिक्षण विभागाने पाठवलेले यूजर मॅन्युअल अनुसरावे, असेही निर्देश दिले आहेत.
विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवताना ‘विद्यार्थी उपस्थिती’ या टॅबवर क्लिक करून प्रत्येक विद्यार्थ्याच्या उपस्थिती/अनुपस्थितीची नोंद करायची आहे. एका शिक्षकाकडे एकापेक्षा जास्त इयत्तांची जबाबदारी असल्यास प्रत्येक वर्गासाठी ही प्रक्रिया स्वतंत्रपणे करावी लागेल. उपस्थिती माहिती नोंदवल्यानंतर अंतिम ‘दाखल करा’ पर्यायावर क्लिक करून ती सबमिट करणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापकांसाठी ॲपमध्ये स्वतंत्र ‘शिक्षक उपस्थिती’ मॉड्यूल असून त्याद्वारे सर्व शिक्षकांची हजेरी चिन्हांकित करावी लागणार आहे.