मुंबई : प्रजनन उपचारांवरील वयाशी संबंधित निर्बंध कमी करण्यात यावेत, अशी विनंती करीत मूल नसलेल्या मुंबईतील एका दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकाकर्त्या दाम्पत्यापैकी पतीने काही महिन्यांपूर्वी वयाची 55 वर्षे ओलांडली आहेत. मात्र, आई-बाबा बनण्यासाठी या वयाचा अडथळा बनू न देता मध्य मुंबईतील प्रजनन आणि इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) क्लिनिकमध्ये उपचार सुरू ठेवण्यास मुभा द्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्या दाम्पत्याने केली आहे.
सहायक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) कायदा, 2021 मधील तरतुदीनुसार 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला आणि 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांसाठी उपचार कायदेशीररीत्या प्रतिबंधित केले आहेत.
या पार्श्वभूमीवर, संबंधित दाम्पत्याने न्यायालयाचे दार ठोठावले आहे. डिसेंबर 2018 मध्ये लग्न झालेले हे जोडपे वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असले, तरी त्यांना मूल होऊ शकलेले नाही. 2020 पासून त्यांनी वेगवेगळ्या केंद्रांवर केलेल्या अनेक आयव्हीएफ प्रक्रिया अयशस्वी झाल्या आहेत.
यातील पत्नी 47 वर्षांची आहे, तर पतीने 55 वर्षे वयाचा उंबरठा ओलांडला आहे. या जोडप्याने कुटुंबनिर्मिती चालू ठेवण्याचा मूलभूत अधिकार असल्याचा दावा याचिकेत केला आहे.