School Education Pudhari News Network
मुंबई

English Medium Education: स्थानिक भाषांतील शाळांत विद्यार्थीगळती; इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा वाढता कल

दहा वर्षांत मराठी, हिंदी, उर्दू प्रवेशात मोठी घट; इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या 31% ने वाढल्याचे अहवालातून स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये स्थानिक भाषांतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या दशकात लक्षणीयरीत्या घटली असून इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल झपाट्याने वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. मराठीसह हिंदी, उर्दू आणि इतर प्रादेशिक भाषांमधील पहिलीच्या वर्गातील प्रवेशसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून, इंग्रजी माध्यमातील प्रवेशात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे.

प्रजा फाउंडेशनने तयार केलेल्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. हा अहवाल मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत सादर करण्यात आला. पालिकेच्या शाळांमधील गेल्या दहा वर्षांच्या प्रवेश आकडेवारीचे विश्लेषण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

अहवालानुसार, 2015-16 या शैक्षणिक वर्षात पालिका शाळांमधील पहिलीच्या वर्गात मराठी माध्यमात 6 हजार 104 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. मात्र 2024-25 मध्ये ही संख्या घटून 4 हजार 369 इतकी राहिली आहे. म्हणजेच मराठी माध्यमातील प्रवेशात सुमारे 28 टक्क्यांची घट झाली आहे. हिंदी माध्यमातील प्रवेशसंख्येतही मोठी घट दिसून येते. 2015-16 मध्ये 9 हजार 141 विद्यार्थी हिंदी माध्यमात प्रवेशित होते; ती संख्या 2024-25 मध्ये 6 हजार 679 इतकी झाली असून 27 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली.

उर्दू माध्यमातही 9 हजार 69 वरून 7 हजार 343 इतकी घट झाली असून ती सुमारे 19 टक्के आहे. इतर प्रादेशिक भाषांमधील परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. गुजराती, कन्नड, तमिळ आणि तेलुगू माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या गेल्या दशकात मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तेलुगू माध्यमातील प्रवेशसंख्या 174 वरून अवघी 26 इतकी राहिली असून जवळपास 85 टक्क्यांची घसरण झाली आहे.

याउलट इंग्रजी माध्यमातील चित्र पूर्णपणे वेगळे दिसते. 2015-16 मध्ये पालिका शाळांमधील इंग्रजी माध्यमातील पहिलीच्या वर्गात 8 हजार 726 विद्यार्थी होते. 2024-25 पर्यंत ही संख्या वाढून 11 हजार 403 इतकी झाली असून जवळपास 31 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. यावरून पालकांचा कल मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमाकडे वळत असल्याचे स्पष्ट होते.

माध्यमनिहाय चित्र

माध्यम 2015-16 2024-25 वाढ/ घट

मराठी 6,104 4,369 28% घट

हिंदी 9,141 6,679 27% घट

उर्दू 9,069 7,343 19% घट

इंग्रजी 8,726 11,403 31% वाढ

गुजराती 420 162 61% घट

कन्नड 189 75 60% घट

तमिळ 539 233 57% घट

तेलुगू 174 26 85% घट

एकूण 34,549 30,390 12% घट

शाळांतील प्रवेश संख्येतही घट

पालिका शाळांमधील एकूण प्रवेशसंख्येतही घट झाल्याचे या अहवालातून समोर आले आहे. 2015-16 मध्ये पहिलीच्या वर्गात 34 हजार 549 विद्यार्थी प्रवेशित होते; ती संख्या 2024-25 मध्ये 30 हजार 390 इतकी राहिली असून सुमारे 12 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT