BMC  Pudhari Photo
मुंबई

BMC printing press scam : पालिका प्रिंटिंग प्रेसमध्ये 6 कोटी 60 लाखांचा घोटाळा!

पालिका सभागृहात अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता दिसून येत आहे. 6 कोटी 60 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल महापालिका सभागृहात सादर करावा, असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

महापालिकेच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये होणाऱ्या करोडो रुपयांच्या घोटाळ्याचा मुद्दा हरकतीच्या मुद्द्याद्वारे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण छेडा यांनी मुंबई महापालिका सभागृहात उपस्थित केला. डिजिटल मोनोक्रोम प्रोडक्शन प्रिंटर खरेदीसाठी काढण्यात आलेल्या निविदामध्ये देण्यात आलेले दर बाजारभावापेक्षा जवळपास दुप्पट आहे.

यामुळे महानगरपालिकेला सुमारे 6 कोटी 60 लाख रुपये आर्थिक नुकसान होण्याची शक्यता छेडा यांनी महापालिका सभागृहाच्या निदर्शनास आणली. खरेदी करण्यात येणाऱ्या प्रिंटरचा दर बाजारभावापेक्षा जास्त आहे. सध्या एक प्रत काढण्यासाठी 40 पैसे दर आकारला जात असताना नव्या कंत्राटामध्ये 72 पैसे दर आकारला जाणार आहे.

दोन्ही दरातील फरक सुमारे 32 पैसे इतका आहे. या प्रिंटिंग मशीनद्वारे 20 कोटी प्रिंट काढण्याचे निश्चित झाल्यामुळे 6 कोटी 60 लाख रुपयांच्या जवळपास आर्थिक नुकसान होणार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे या संपूर्ण निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी. निविदा प्रक्रिया राबवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करून महापालिकेची लूट थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अखेर महापौर रितू तावडे यांनी हरकतीचा मुद्दा राखून ठेवत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल महापालिका सभागृहात सादर करावा अशी निर्देश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT