Hospital Cleaning Tender Controversy Pudhari
मुंबई

Hospital Cleaning Tender Controversy: रुग्णालयांच्या स्वच्छतेचा प्रस्ताव अखेर फेटाळला; स्थायी समितीत आक्षेप

ठेकेदाराची मक्तेदारी नको

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या आठ प्रमुख रुग्णालयांतील साफसफाई कामाचा 101 कोटींच्या प्रस्तावावर बुधवारी स्थायी समिती सदस्यांनी अनेक आक्षेप घेतले. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव पुनर्विचारासाठी परत पाठवत असल्याचे जाहीर केले.

या प्रस्तावाला सर्वच सदस्यांनी विरोध केला. सर्व रुग्णालयांच्या स्वच्छतेचे काम एकाच कंपनीला देणे अयोग्य असल्याची भूमिका सदस्यांनी बैठकीत घेतली.

सभागृह नेते गणेश खणकर यांनी सर्व रुग्णालयांचे काम एकाच संस्थेला का दिले जात आहे, असा प्रश्न उपस्थित करीत ही मक्तेदारी होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनीही चिंता व्यक्त केली.

यात जनतेच्या पैशांचा संबंध असून प्रत्येक निर्णयात पारदर्शकता आवश्यक आहे. त्यांनी रुग्णालयातील स्वच्छतागृहांच्या दयनीय अवस्थेचाही मुद्दा उपस्थित केला. नवीन कंत्राटे देण्यापूर्वी त्यात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

एमआयएम नगरसेवक जमीर कुरेशी यांनी स्वच्छतेचे काम ज्या कंपनीला दिले आहे, ती कंपनी अपात्र ठरवलेली आहे. यामुळे सदर प्रस्ताव पुन्हा तयार करण्याच्या सूचना त्यांनी केली.

भाजपचे नगरसेवक तेजिंदर तिवाना यांनीही सदर निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेतले. काही विशिष्ट कंपन्यांना झुकते माप देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मनुष्यबळ आणि कामाबद्दल स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

काँग्रेस गट नेते अश्रफ आझमी यांनी हा प्रस्ताव ‌‘दाखल‌‘ करण्यात यावा, जेणेकरून त्याची नोंद करून पुढील तपास करता येईल, अशी सूचना केली.

आमदार मिहिर कोटेचा यांच्या पत्राचा संदर्भ देत काही सदस्यांनी सांगितले की, यापूर्वीही निविदा प्रक्रियेत पक्षपाताचे आरोप झाले आहेत, त्यामुळे या प्रकरणातही निष्पक्ष चौकशी आवश्यक असल्याचे सांगितले.

शेवटी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी अनियमितता किंवा पक्षपाताचा कोणताही संशय असल्यास, त्याची प्रथम चौकशी झाली पाहिजे अशी भूमिका घेत हा पुनर्विचारासाठी परत पाठवत असल्याचे जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT