Shiv Sena Thackeray Campaign (File Photo)
मुंबई

BMC General Body Chaos: खोक्यांवरून दोन्ही शिवसेना भिडल्या!

महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत गोंधळ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सभागृहात महापौरांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले यांचे नाव घोषित करताच, ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी 50 खोके एकदम ओके.. अशी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या रणरागिणी आणि ठाकरे गटाच्या रणरागिणी भिडल्या. त्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता.

मुंबई महापालिका सभागृहात समिताच्या सदस्य पदाची घोषणा करण्यापूर्वी गटनेत्यांची घोषणा करण्यात आली. यावेळी महापौर रितू तावडे यांनी शिवसेना गटनेतेपदी अमय घोले यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी पन्नास खोके, एकदम ओके.. ओरडण्यास सुरुवात करताच शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव व यामिनी जाधव जागेवरून उठत, थेट शिवसेनेच्या नगरसेवकांशी भिडल्या. तुमची घोषणाबाजी थांबवा, आम्हालाही खूप बोलता येईल, असे धमकावून सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेविकाही बेंचवरून उठत विश्वासराव व यामिनी जाधव यांना नडल्या. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

सभागृहात कामकाज सुरू असताना झालेल्या गोंधळामुळे महापौर यांनी दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांना शांतता बाळगण्याची सूचना केली. पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर महापौरही थोड्या चिडल्या. महापालिका सभागृहाच्या काही प्रथा परंपरा असून त्या पाळा असे त्यांनी सुचवत, नगरसेवकांना गप्प करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी सभागृह नेते गणेश खणकर व भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी नगरसेवकांना समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर अनेक प्रयत्न केल्यानंतर दोन्ही नगरसेवक शांत झाले. त्यामुळे पुढचे कामकाज करणे महापौरांना शक्य झाले.

10 मिनिटे सभागृह उशिरा सुरू झाल्यामुळे गोंधळ

मुंबई महानगरपालिकेची सभा दुपारी अडीच वाजता ठेवण्यात आली होती. त्यामुळे आजच्या सभेला सर्वच नगरसेवक उपस्थित होते. विशेष म्हणजे अडीच वाजण्यापूर्वी नगरसेवक सभागृहात येऊन बसले, पण महापौर आल्याच नव्हत्या. याचा जाब विचारत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. नगरसेवक सभागृहात वेळेत आले असताना महापौर वेळेत का येत नाही, महापौर शिस्तीचे पालन करणार नसतील तर नव्या नगरसेवकांना शिस्त कशी लागेल, असा जाब विचारण्यात आला. अखेर महापौर सभागृहात पोहचताच गोंधळ शांत झाला.

मुलुंड येथील घटनेबद्दल शोक

मुलुंड येथे मेट्रो रेल्वेचा स्लॅब पडून एक जणाचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला. या घटनेबद्दल महापौर रितू तावडे यांनी महापालिका सभागृहात निवेदन सादर करून, मृतांबद्दल शोक व्यक्त केला. त्यानंतर कोणतेही कामकाज न करता सभागृह तहकूब करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT