Mumbai municipal corporation news Pudhari
मुंबई

BMC Promotion News: महापालिकेतील 161 साहाय्यक अभियंत्यांची होणार पदोन्नती

17 एप्रिल रोजी महापालिका मुख्यालयात प्रमोशन कमिटीची बैठक पार पडली.

पुढारी वृत्तसेवा

प्रकाश साबळे

मुंबई: मुंबई महानगरपालिकेत गेल्या 3 ते 4 वर्षांपासून साहाय्यक अभियंता संवर्गातील अभियंत्यांच्या रखडलेल्या पदोन्नतीला अखेर मुहूर्त मिळाला असून तब्बल 161 साहाय्यक अभियंत्यांची कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एप्रिल महिन्याच्या अखेरीस पदोन्नती झालेल्या कार्यकारी अभियंत्यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित होणार असल्याची माहिती नगर अभियंता विभागातील प्रशासनाकडून देण्यात आली.

महापालिकेतील यांत्रिकी आणि सिव्हिल या दोन विभागांत अभियंते कार्यरत आहेत. सिव्हिल (स्थापत्य) विभागातील 161 साहाय्यक अभियंत्यांची प्रशासकीय राजवटीत पदोन्नती रखडली होती. मात्र आता महापालिकेत सत्ताधारी पक्षातील नगरसेवक बहुमताने सभागृहात विराजमान झाल्याने या साहाय्यक अभियंत्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

17 एप्रिल रोजी महापालिका मुख्यालयात प्रमोशन कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत सुमारे 161 साहाय्यक अभियंत्यांची पदोन्नती करण्याचे ठरविण्यात आले आहे. तसा प्रस्ताव नगर अभियंता विभागाकडून लवकरच महापालिकेच्या सभागृहात सादर करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या विभाग कार्यालयात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून विभाग कार्यकारी अधिकारी, पदनिर्देशक अधिकारी (डीओ) तसेच नगर विकास विभाग, बिल्डिंग व इमारत विभाग, कोस्टल रोड, पूल, रस्ते विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, मल:निसारण जलवाहिनी, सीटीआरसी, मालमत्ता असे सुमारे 30 विविध खात्यांमध्ये कार्यकारी अभियंता संवर्गातील पदे रिक्त होती. यामुळे याचा थेट परिणाम हा विकासकामांवर होत होता.

विभाग कार्यालयांसह इतर विभागांचा कार्यभार चालविण्यासाठी सहाय्यक अभियंत्यांना प्रभारी कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला होता.

या विभागांत येणार कार्यकारी अभियंते :

महापालिकेतील 16 विभाग कार्यालये, 23 विभागांतील पदनिर्देशक अधिकारी आणि नगर विकास, इमारत व प्रप्रोजर विभाग, दक्षता विभाग, रस्ते वाहतूक, प्रोजेक्ट, जल अभियंता, मल:निसारण, सिव्हरेज ऑपरेशन, इमारत व परिरक्षण, शाळा व पायाभूत सुविधा, मध्यवर्ती खरेदी खाते.

या वॉर्डांत होणार नियुक्ती

बी, सी, डी, जी.उत्तर, जी.दक्षिण, एच.पूर्व, एच.वेस्ट, एल, एम.पूर्व, एम.वेस्ट, पी.पूर्व, पी.दक्षिण, आर.दक्षिण, आर.उत्तर, एस आणि टी वॉर्ड.

या विभागांत पदनिर्देशक अधिकारी म्हणून नियुक्ती

ए, बी, सी, डी, एफ.उत्तर, एफ.दक्षिण, जी.उत्तर, जी.दक्षिण, एच.पश्चिम, एच.पूर्व, के.पूर्व, के.पश्चिम, एल, एम.पूर्व, एम.पश्चिम, एन, पी.उत्तर, पी.दक्षिण, पी.पश्चिम, आर.दक्षिण, आर.मध्य, सी आणि टी विभाग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT