Who is Santosh Dhuri Pudhari
मुंबई

Who is Santosh Dhuri: मनसेच्या आंदोलनाचा चेहरा भाजपमध्ये; कोण आहेत संतोष धुरी? जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे युतीला धक्का बसला आहे. मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांना उमेदवारी न मिळाल्याने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

Rahul Shelke

Santosh Dhuri Joins BJP: मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांना मोठा धक्का बसला आहे. एकीकडे नेत्यांची गळती, तर दुसरीकडे जागावाटपातून निर्माण झालेली नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे.

काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर शुभा राऊळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता मनसेला आणखी एक धक्का बसला आहे. मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होणारा हा पक्षप्रवेश राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे.

कोण आहेत संतोष धुरी?

संतोष धुरी हे 194 क्रमांकाच्या वॉर्डमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीत जागावाटप ठरवताना हा वॉर्ड ठाकरे गटाच्या शिवसेनेला देण्यात आला. त्यामुळे या वॉर्डमधून शिवसेनेने निशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आणि धुरी यांना संधी मिळाली नाही. याच निर्णयामुळे ते नाराज असल्याचं मागील काही दिवसांपासून चर्चेत होतं.

काल रात्री उशिरा संतोष धुरी यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आज दुपारी भाजप नेते अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे. या घडामोडींमुळे मुंबईतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हं दिसत आहेत.

मनसेच्या संघटनात्मक रचनेत संतोष धुरी यांना महत्त्वाचं स्थान होतं. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये ते सक्रिय होते. मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्याशी त्यांची जवळीक होती. मागील महापालिका निवडणुकीत त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती, मात्र तेव्हा त्यांना अपयश आलं होतं. यंदा युतीमुळे संधी मिळेल, अशी अपेक्षा होती; पण ती फोल ठरली.

या पक्षप्रवेशामुळे मनसेपुढील आव्हानं अधिक वाढण्याची शक्यता आहे. आधीच युतीतील जागावाटपावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू असताना, आता संतोष धुरी हे भाजमध्ये जात असल्यामुळे मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीआधी सुरू असलेली ही पक्षांतरांची मालिका शेवटच्या टप्प्यातील राजकीय समीकरणं बदलू शकते, असं राजकीय जाणकारांचं मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT